वायंगणी ग्रामपंचायतचा मानवतावादी निर्णय…

गावातील निराधार नागरिकांना मिळणार दिलासा….

वेंगुर्ले : दाजी नाईक  : वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी गावातील निराधार नागरिकांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय ग्रामपंचायत वायंगणीने घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या मासिक बैठकीत हा मानवतावादी निर्णय घेतला असल्याचे सरपंच श्री. दत्ताराम उर्फ अवी अरुण दुतोंडकर यांनी सांगितले.

ग्रामपंचायतच्या कार्यकारिणीच्या मासिक बैठकीत एकमताने हा ठराव मंजूर करत गावातील निराधार नागरिकांना घरपट्टी पूर्णतः माफ तसेच स्मशानभूमी शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

या निर्णयामुळे गावातील गरजू, निराधार कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या समाजाभिमुख निर्णयामुळे वायंगणी ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दरम्यान या बैठकीला सरपंच श्री. दत्ताराम (अवि) अरुण दुतोंडकर, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य श्री. रविंद्र सहदेव धोंड, ग्रामपंचायत कार्यकारिणी सदस्य श्री. अनंत (विनू) दत्तात्रय मठकर, सौ. दिपाली दिनेश नांदोसकर, सौ. विद्या विवेक कांबळी, सौ. सविता संभाजी परब, सौ. विद्या शैलेश गोवेकर, सौ. राखी बाळा धोंड, ग्रामपंचायत अधिकारी मधुकर नवार आदी उपस्थित होते.