शिक्षक भारतीचे कार्य आदर्शवत; शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध: श्रीम.सुमेधा पाताडे

 

▪️शिक्षक भारती मालवण त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न

मसुरे | झुंजार पेडणेकर :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणचे त्रैवार्षिक अधिवेशन ओम गणेश मंगल कार्यालय कट्टा येथे संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्रीम.सुमेधा संतोष पाताडे,पंचायत समिती सभापती श्रीम.प्रज्ञा चव्हाण,गटशिक्षणाधिकारी श्री संजय माने, शिक्षक भारतीचे राज्य संघटक श्री किसन दुखंडे,प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे,सचिव श्री.गिल्बर्ट फर्नांडिस,कणकवली तालुकाध्यक्ष श्री.महेंद्र पवार मान्यवर उपस्थित होते. प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.श्रीम.नेहाले व श्रीम.सकडे यांनी स्वागत गीत सादर केले.

व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व वृक्ष रोप देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव कृष्णा कालकुंद्रीकर सर यांनी केले.

जिल्हा सरचिटणीस गिल्बर्ट फर्नांडीस यांनी जिल्हा परिषद स्तरावरील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत लक्ष वेधले.मालवण तालुक्याचे काम हे आदर्शवत आहे असे सांगितले.जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी संघटनेने वर्षभर राबविलेले उपक्रम शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी संघटनेने केलेली धडपड,राबवलेले सामाजिक उपक्रम याबद्दल तालुका शाखेचे कौतुक केले.त्याचवेळी प्रशासनाकडून केला जाणारा दुजाभाव,प्रश्नाबाबत केली जाणारी चालढकल,याबाबत नाराजी व्यक्त केली. क्रीडा शिष्यवृत्ती,शिक्षणसेविका यांचे प्रसूती रजा वेतन,वरिष्ठ वेतन श्रेणी तसेच बरीच वर्षे प्रलंबित शिक्षकांचे प्रश्न याकडे लक्ष वेधले.संघटनेचे महत्त्व,आत्मियता व संघटनेकडून केली जाणारी प्रश्नांची सोडवणूक याबाबत सर्व सभासदांना मार्गदर्शन केले. जिल्हापरिषद सदस्या श्रीम.सुमेधा पाताडे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.शाळेची वीज बिले,संच मान्यता,क्रीडा शिष्यवृत्ती शिक्षकांचे प्रश्न आपण जिल्हास्तरावरून सोडवण्याचे आश्वासन दिले. गटशिक्षणाधिकारी श्री.माने यांनी तालुकास्तरावर विविध प्रकारचे शिक्षकांचे प्रश्न घेऊन व ते निकाली लावण्यासाठी धडपडणारी एकमेव संघटना म्हणून संघटनेचा गौरव केला.संघटनेची ध्येयधोरणे व शिक्षकव विद्यार्थी यांप्रती असणारी भावना पाहून नव्याने रुजू झालेले जास्तीत जास्त शिक्षक या संघटनेमध्ये आल्याने आगामी काळात जिल्ह्याचे नेतृत्व करणारी संघटना असेल असे मत व्यक्त केले.मालवण तालुक्यातील शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून मांडले जाणारे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून त्वरीत निपटारा करू.असे आश्वासन दिले. संघटनेकडून प्राप्त झालेले निवेदन व मांडण्यात आलेल्या सूचना त्याबाबत आपण गंभीर असून जवळील काळात त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले व संघटनेकडून पुढील काळात अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन व सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी विद्यार्थी व शिक्षकांबद्दल आदर व प्रेम व्यक्त केले आज शिक्षकांवर विविध माध्यमातून किंवा शासनाकडून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान याबाबत विचार व्यक्त केले. भविष्यकाळात अशा प्रकारच्या जबाबदाऱ्यांपासून शिक्षकाला कसे मुक्त करता येईल. शिक्षक आणि विद्यार्थी यांना जास्तीत जास्त काळ कसा उपलब्ध करून दिला जाईल व शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे तालुका स्तरावरील प्रश्न विचारविनिमय करून कशा प्रकारे सोडवले जातील याबाबत चर्चा केली व आपण सर्वतोपरी संघटनेला सहकार्य करू असे आश्वासन दिले.तसेच शालेय दुरुस्ती,स्वच्छतागृह प्रस्ताव करण्याबाबत सांगितले.या संघटनेकडून दत्तक अनाथ विद्यार्थी उपक्रम हा समाजाशी नाळ जोडणारा असल्याचे मत व्यक्त केले.

आजच्या या त्रैवार्षिक अधिवेशनानिमित्त कै.राजेंद्र ठाकूर गुरुजी स्मरणार्थ इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील प्रथम १० विद्यार्थी सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच बॅ.नाथ पै.मालवण व शिक्षक भारती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील प्रथम १० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षीचा कै.राजेंद्र ठाकूर कलारत्न पुरस्काराने श्रीम.सुजाता शेलटकर यांना सन्मानित करण्यात आले.तालुक्यातील २१ होतकरू व गरीब विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळा गोळवण नं.१,शाळा माळगाव हुमरोस, पीएमश्री प्राथमिक शाळा चौके,जिल्हा परिषद शाळा आडवली नं.१,प्राथमिक शाळा पराड या पाच शाळाना आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये सन्मानपत्र सन्मानचिन्ह वृक्ष शाल श्रीफळ असे स्वरूप होते. श्रीम.निलम बोर्डवेकर श्रीम.नम्रता पावसकर,श्री धानजी चव्हाण या शिक्षकांना त्यांनी केलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले.

जिल्हा परिषद आयोजित कला क्रीडा महोत्सवमध्ये जिल्हास्तरावर प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये पियुषा कुंभार,प्रणव कांबळी,ऐश्वर्या तोडणकर,ज्ञानी मी होणार मोठा गट प्रथम क्रमांक शाळा असगणी नं.१ या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर जिल्हाध्यक्ष यांनी २०२६ ते २९ साठी मालवण तालुक्याची नवीन कार्यकारणी जाहीर केली.तालुकाध्यक्ष म्हणून श्री.संतोष कोचरेकर सरचिटणीस श्री.अंकुश कणेरकर,कार्याध्यक्ष श्री. प्रमोद पाटील यांच्यासह ६४ जणांची कार्यकारणी जाहीर केली.पुढील वर्षापासून दिवंगत सदस्य कै.देवेंद्र रावजी चव्हाण यांच्या स्मरणार्थ इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा व मार्गदर्शन वर्ग सुरू करणार असल्याबाबतचे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले.त्यानंतर तालुकाध्यक्ष.श्री दिनकर शिरवलकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या तीन वर्षीय कामकाजाचे वर्णन केले संघटनेने सोडवलेले विविध प्रश्न राबवलेले उपक्रम याबाबत माहिती दिली. संघटनेचे उपक्रम यशस्वी करण्यासाठी व संघटना वाढीसाठी मदत केलेल्या सर्व सभासदांचे ,संस्थांचे आभार व्यक्त केले. शेवटी लकी ड्रॉने गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नागेश जाधव यांनी केले व श्री संजय जाधव यांनी आभार मानले.यावेळी व्यासपीठावर तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य,सरपंच व संघटनेचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.