राणेंच्या नेतृत्वावर विश्वास; कडावलमध्ये विकासाला गती मिळण्याची अपेक्षा
स्वप्निल कदम -कुडाळ : कडावल ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत चुरशीची शक्यता वर्तवली जात असतानाच अखेर सर्वच जागा बिनविरोध निवडून आल्याने शिवसेनेचा भगवा ग्रामपंचायतीवर फडकला आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत सरपंचपदासह सर्व ८ जागा निर्विवादपणे आपल्या बाजूने केल्या.
या निवडणुकीत रश्मी मोरजकर/कोरगावकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असून सदस्य म्हणून स्वरूप वाळके, समीर परब, सुचिता देवळी, अंकिता मुंज, कार्मेलीन पिंटो, शांतिसेन अटक आणि प्रज्ञा कोळापटे यांची निवड झाली आहे. युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके व सहकाऱ्यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत गावात एकोपा निर्माण केला.
गेल्या अनेक वर्षांनंतर ग्रामपंचायतीत झालेल्या या बदलामुळे गावाच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रलंबित विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
दरम्यान, बिनविरोध निवडणुकीमुळे गावात समाधानाचे वातावरण असून कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.












