सावंतवाडी:सोनुर्ली-जाधववाडी येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत युवराज जाधव, विघ्नेश जाधव आणि चैतन्या गावकर यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. महिलांसाठी आयोजित ‘पदर रमाईचा’ खेळ पैठणी स्पर्धेत अनुष्का जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावून पैठणीचा मान मिळवला. तसेच ‘जयभीम रिल्स स्टार’ स्पर्धेत अभिषेक अवटी आणि भीमगीत गायन स्पर्धेत आसोलीच्या प्रज्ञा सूर्य ग्रुपने यश संपादन केले.
२९ एप्रिल रोजी बुद्ध पूजा व अभिवादन सभा पार पडली. यावेळी महेंद्र मातोंडकर यांनी ‘संविधान आमचा प्राण’ या विषयावर व्याख्यान दिले. सामाजिक बांधिलकी म्हणून उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या सहकार्याने रक्तदान आणि नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सोहळ्यात नागेश गावकर, संतोष ओटवणेकर, दाजी गावकर, नवनियुक्त सभापती सुस्मिता जाधव आणि वैदही जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच नारायण हिराप, उपसरपंच भरत गावकर, सतीश सोनुर्लेकर, लक्ष्मीदास ठाकूर यांसह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्व कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.












