दोडामार्ग : सुहास देसाई
“पूर्वीच्या शाळा या केवळ सिमेंट-काँक्रीटच्या इमारती नव्हत्या, तर त्या शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांवर संस्कार करणाऱ्या आणि जीवनाला योग्य आकार देणारी ज्ञानमंदिरे होती. आजच्या भौतिक सुविधांच्या युगात मुलांची ऊर्जा सकारात्मक ठेवायची असेल, तर त्यांना मूल्यशिक्षणाचे धडे देणे आणि स्वतःचे आचरण शुद्ध ठेवणे काळाची गरज आहे,” असे प्रेरणादायी विचार विद्याभारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व समुपदेशक श्री. दिलीप बेतकेकर यांनी व्यक्त केले.
सरस्वती विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज, कुडासेच्या माजी विद्यार्थी संघाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर होते.
शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार
माजी विद्यार्थी संघाचे सचिव श्री. दत्तप्रसाद देसाई यांनी यावेळी संघाच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेसाठी सुमारे १८ लाख रुपयांचा निधी जमा केला असून, त्यातून शाळेत विविध भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी संघ भविष्यातही जोमाने काम करेल.”
गुणवत्तेत अव्वल कामगिरी
संघाचे अध्यक्ष श्री. संदेश तळणकर व पदाधिकारी श्री. दादा देसाई यांनी शाळेच्या यशाबद्दल माहिती दिली. पालक, शिक्षक आणि दाते यांच्या सहकार्यामुळे ही शाळा गुणवत्तेत अव्वल असून, यंदा बारावी शास्त्र शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे, तसेच माध्यमिक शालांत परीक्षेतही शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.
अनुभवातूनच व्यक्तिमत्व विकास: ॲड. नकुल पार्सेकर
अध्यक्षीय भाषणात ॲड. नकुल पार्सेकर यांनी ४५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “त्या काळातील संघर्षानेच माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण केली. आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द याच शाळेने दिली. आज तंत्रज्ञानाच्या युगात मानवी स्वभावात होणारे बदल चिंताजनक असून, त्यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.” शाळेच्या भविष्यातील प्रकल्पांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
उपस्थित मान्यवर
यावेळी श्री. प्रकाश कुडासकर, संतोष देसाई, रामदास मेस्त्री, नंदकिशोर नाईक, सौ. तळणकर यांसह अनेक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी आपल्या मनोगतातून शाळेप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव श्री. देसाई यांनी केले, तर मुख्याध्यापक जालिंदर शेंडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.













