मारहाण प्रकरणी आरोपीला दंड; कणकवली न्यायालयाचा निकाल

कणकवली : तालुक्यातील कलमठ येथील मारहाण प्रकरणी आरोपी परशुराम उर्फ प्रकाश आप्पा बांदिवडेकर (वय ४०, रा. कलमठ गावडेवाडी) याला कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. आरोपीला १००० रुपये दंड आणि फिर्यादीला ४००० रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, २०१८ मध्ये कलमठ येथे बाळकृष्ण चिंदरकर यांना मारहाण व शिवीगाळ झाली होती. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाणचे यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

सदर खटल्याची सुनावणी शुक्रवारी ८ मे रोजी पार पडली. यामध्ये सरकारी अभियोक्ता आशिष उल्हाळकर यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी परशुराम उर्फ प्रकाश आप्पा बांदिवडेकर (रा. कलमठ गावडेवाडी) याला भारतीय दंड संहिता ३२३ अन्वये १००० रुपये दंड ठोठावला. हा दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास भोगावा लागेल. तसेच फिर्यादी बाळकृष्ण चिंदरकर यांना ४००० रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले असून, ती न दिल्यास १५ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.