आंबोली पर्यटन व्यवसायिक संघाच्या कार्याध्यक्षपदी आदर्श राऊत; सचिवपदी दिपक गावडे यांची निवड

आंबोली:येथील ‘आंबोली टुरिझम’शी संलग्न असलेल्या ‘आंबोली पर्यटन व्यवसायिक संघा’च्या कार्याध्यक्षपदी आदर्श ज्ञानेश्वर राऊत व सचिवपदी दिपक गावडे (चौकुळ – नेनेवाडी) यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

आंबोली, चौकुळ आणि गेळे परिसरातील पर्यटन व्यवसायिकांच्या हक्कासाठी, समस्या निवारणासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी हा संघ कार्यरत आहे. युवा पिढीला या क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष निर्णय राऊत व उपाध्यक्ष अजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.

या निवडीनंतर बोलताना आदर्श राऊत यांनी सांगितले की, परिसरातील पर्यटन व्यवसायिकांच्या हितासाठी आणि पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आगामी काळात विविध समित्यांवर तरुणांना संधी दिली जाणार असून नव्या व्यवसायिकांची नोंदणीही केली जाईल, असे उपाध्यक्ष अजय राऊत यांनी स्पष्ट केले.

या निवडीबद्दल आदर्श राऊत व दिपक गावडे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.