व्हर्च्युअल रॅम फीचरमुळे वाढू शकतो फोनवर ताण
अनेक स्मार्टफोन वापरकर्त्यांना मोबाईल हँग होणे किंवा स्लो चालण्याची समस्या सतावत असते. फोनचा वेग वाढवण्यासाठी कंपन्या ‘व्हर्च्युअल रॅम’ हे फीचर देतात, मात्र हे फीचर काही वेळा उलट परिणाम करू शकते. या सेटिंगमुळे फोनच्या अंतर्गत स्टोरेजचा वापर रॅमसारखा केला जातो. त्यामुळे प्रोसेसरवर अतिरिक्त ताण येऊन मोबाईल स्लो होण्याची शक्यता वाढते. तज्ज्ञांच्या मते, हे फीचर बंद केल्यास फोनची कार्यक्षमता सुधारू शकते.
प्रहार डिजिटल : आजकालच्या स्मार्टफोनमध्ये ‘व्हर्च्युअल रॅम’ हे फीचर मोठ्या प्रमाणात दिले जाते. मोबाईलची रॅम वाढल्याचा अनुभव देण्यासाठी हे फीचर वापरले जाते. मात्र, प्रत्यक्षात हे फीचर फोनच्या इंटरनल स्टोरेजचा वापर करून अतिरिक्त रॅम तयार करते.
फोनची मूळ रॅम ही वेगवान असते, तर इंटरनल स्टोरेज तुलनेने संथ असते. त्यामुळे व्हर्च्युअल रॅम सुरू असल्यास प्रोसेसरवर अधिक ताण येतो आणि मोबाईल वारंवार हँग किंवा स्लो होऊ शकतो.
व्हर्च्युअल रॅम बंद केल्याने मिळू शकतो फायदा
तज्ज्ञांच्या मते, जर तुमचा फोन सतत स्लो चालत असेल तर व्हर्च्युअल रॅम फीचर बंद करून पाहणे फायदेशीर ठरू शकते. हे फीचर बंद केल्यानंतर फोनची मूळ रॅम अधिक कार्यक्षमतेने काम करू शकते आणि अॅप्सचा प्रतिसादही सुधारू शकतो.
ही सेटिंग बंद करण्यासाठी फोनच्या Settings मध्ये जाऊन RAM Expansion, Virtual RAM किंवा Memory Extension अशा पर्यायांचा शोध घ्यावा. त्यानंतर संबंधित फीचर बंद करून फोन रीस्टार्ट करावा.
मोबाईलची कार्यक्षमता सुधारण्यासाठी नियमितपणे अनावश्यक अॅप्स हटवणे, स्टोरेज मोकळे ठेवणे आणि सॉफ्टवेअर अपडेट ठेवणेही महत्त्वाचे मानले जाते.











