रत्नागिरीत १७ मे रोजी वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारतीय हवामान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या हवामान आधारित कृषी सल्ल्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात १५ ते २० मे दरम्यान वातावरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः १७ मे रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार १५, १६ आणि १९ मे रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून १८ मे रोजी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. या कालावधीत कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८३ टक्के तर दुपारची आर्द्रता ७५ ते ७९ टक्क्यांदरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संभाव्य वादळी वातावरण लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे नव्याने लावलेली सुपारी, नारळ, आंबा आणि काजू कलमे यांना आधार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांची वेळेत उपलब्धता करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आंबा उत्पादकांसाठीही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. परिपक्व आंबा फळांची शक्य तितक्या लवकर काढणी करून ती सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवावीत, असे सांगण्यात आले आहे. फळमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गळून पडलेली फळे नष्ट करण्याचे तसेच बागांमध्ये फळमाशी रक्षक सापळे लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खरीप भात हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतजमिनीची नांगरट करून जमीन उन्हात तापू देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच भात रोपवाटिका तयार करताना योग्य निचरा आणि गादीवाफ्यांची तयारी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. कृषी विद्यापीठाने कोकण विभागासाठी शिफारस केलेल्या विविध भात जातींची माहितीही या सल्लापत्रिकेत देण्यात आली आहे.

पशुपालक आणि कुक्कुटपालकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता लक्षात घेऊन जनावरे झाडाखाली बांधू नयेत तसेच सुरक्षित गोठ्यात ठेवावीत, असे सांगण्यात आले आहे. कुक्कुटपालन शेडच्या खिडक्या व्यवस्थित झाकून ठेवण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

ही हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिका डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करण्यात आली असून अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.