लांजा शहरात मुंबई गोवा महामार्ग लगत च्या अतिक्रमण विरोधात कारवाईचा हातोडा

लांजा पंचायतीची धडक मोहीम

लांजा (प्रतिनिधी ):लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या अतिक्रमण विरोधात
लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून या अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारत हटविण्यास सुरुवात केल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. तर या कारवाईमुळे महामार्ग परिसर मोकळा झाला आहे.

शहरातील बाजरपेठेत महामार्गालगत असलेल्या व्यवसायिकांना यापूर्वी अनधिकृत बांधकाम हटविण्यास सांगितले होते. त्यानुसार काहींनी स्वखर्चाने अतिक्रमण काढले, तर उर्वरित अतिक्रमणावर नगरपंचायतीच्या पथकाने कारवाई केली होती. महामार्गालगत वाढलेल्या अतिक्रमणामुळे पादचारी व वाहनचालकांना अडचणी निर्माण होत होत्या.

त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. दरम्यान, यावेळी अतिक्रमण हटवताना व्यवसायिक आणि शासकीय अधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची होऊन वातावरण तापले होते. त्यानंतर व्यवसायिकांनी स्वतःहून आपली दुकाने हटविण्यास सुरुवात केली.

मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. तर आगामी काळातही अतिक्रमणाविरोधातील कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा नगरपंचायतीकडून देण्यात आला आले. तर अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, या कारवाईवेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, लांजा पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले, राष्ट्रीय महामार्ग विभाग शाखा अभियंता कौशिक रहाटे, महामार्ग ठेकेदार कंपनीचे नरेश सितलानी, नगरपंचायत अधिकारी सुचेत बन्ने यांच्यासह नगरपंचायत आणि महामार्ग ठेकेदार कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. ही करवाई सायंकाळी उशीरा पर्यंत सुरु होती.