दापोलीत अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली :तालुक्यातील गिम्हवणे येथील श्री स्टोअर्समध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला असून याप्रकरणी दुकान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १८ मे रोजी दुपारी गिम्हवणे जिल्हा परिषद शाळेजवळील दुकानात करण्यात आली. अन्न सुरक्षा कायदा २००६ तसेच नियम २०११ अंतर्गत प्रतिबंधित असलेल्या पान मसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक केल्याप्रकरणी समीर दामोदर महाडिक (वय ५२, रा. गिम्हवणे, ता. दापोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संकेत शंकरराव कोनेरी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपीकडे मानवी आरोग्यास अपायकारक ठरणारे प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आले होते. शासनाच्या आदेशानुसार अशा पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे असतानाही त्यांची विक्री सुरू असल्याचे तपासात आढळून आले. कारवाईदरम्यान विविध ब्रँडचे पान मसाला, विमल पान मसाला, रजनीगंधा, आरएमडी तसेच सुगंधित तंबाखू असा एकूण ७ हजार ३२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधिताविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.