सकल हिंदू संमेलनात सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव

सिंधूमित्र आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा सत्कार

सावंतवाडी । प्रतिनिधी : हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने सावंतवाडी येथे ‘सकल हिंदू संमेलन’ मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनाचे आयोजन राणी पार्वती देवी हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि निस्वार्थ कामगिरी करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असणारे ‘सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान’चे आनंद मेस्त्री यांचा सत्कार प्रसिद्ध शिवचरित्रकार तथा हिंदवी परिवारचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच, ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’चे रवी जाधव यांचा सत्कार प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला. समाजकार्यातील त्यांच्या योगदानाचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले.

या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून युवा कीर्तनकार ह.भ.प. सायलीताई गावडे आणि ज्ञानप्रबोधिनी सिंधुदुर्गचे मुख्य समन्वयक अमित नाईक उपस्थित होते.

या सकल हिंदू संमेलनाला सावंतवाडी आणि परिसरातील अनेक मान्यवरांसह नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती. हिंदू संस्कृतीचे रक्षण आणि समाजात एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी अशा संमेलनांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन सकल हिंदू संमेलन समन्वय समितीने केले होते.