जादा व्याजापायी पैसे बुडाल्याची गुंतवणूकदारांची चिंता कायम; एजंट भूमिगत,शिवम असोसिएट मध्ये गुतवणूक 

 

असोसिएट दोडामार्ग (प्रतिनिधी):

जादा व्याजाच्या मोहापायी यापूर्वी अनेकदा पैसे बुडाल्याच्या घटना ताज्या असतानाच, बेळगावच्या ‘शिवम असोसिएट’मध्ये पैसे गुंतवणाऱ्या दोडामार्गातील गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. बेळगाव येथील शिवम असोसिएटवर महसूल, सहकार आणि पोलीस दलाने संयुक्त छापा टाकून कारवाई केल्याने, या संस्थेचे चालक शिवानंद नीलण्णावर अचानक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या कारवाईचे पडसाद आता दोडामार्ग तालुक्यात उमटू लागले असून, सलग दुसऱ्या दिवशीही अनेक गुंतवणूकदारांच्या छातीचे ठोके वाढले आहेत.

१ लाखाला ३ हजार रुपये व्याज!

मिळालेल्या माहितीनुसार, शिवम असोसिएटने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दरमहा १ लाखाला ३ हजार रुपये व्याज देण्याचे आमिष दाखवले होते. या आकर्षक व्याजाच्या भुरळीला पडून दोडामार्गातील शेकडो नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई या संस्थेत गुंतवली.

माजी सैनिकांची पूंजी धोक्यात?

दोडामार्ग तालुक्यात या संस्थेचे जाळे पसरण्यामागे एका माजी सैनिकाचा मोठा हात असल्याची खात्रीलायक चर्चा आहे. सैन्यदलातून चांगल्या हुद्द्यावरून निवृत्त झालेल्या या माजी सैनिकाचा स्वभाव सुशिक्षित आणि इतर माजी सैनिकांना मदत करण्याचा होता. त्यामुळे सुरुवातीला तालुक्यातील अनेक माजी सैनिक या संस्थेशी जोडले गेले.

देशसेवेतून निवृत्त झाल्यानंतर पुढील आयुष्यासाठी मिळालेली हक्काची पूंजी अनेक सैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या संस्थेत सुरक्षित ठेव म्हणून गुंतवली होती. मात्र, आता या कारवाईमुळे अनेकांचे संसार संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.

मोठ्या कार्यक्रमांद्वारे घातली भुरळ

केवळ माजी सैनिकच नव्हे, तर तालुक्यातील अनेक नामांकित व्यावसायिक आणि सर्वसामान्यांनीही यात मोठ्या ठेवी ठेवल्या आहेत. शिवम असोसिएटतर्फे आयोजित करण्यात आलेले भव्य मेळावे, कॅम्पेनिंग आणि मोठ्या कार्यक्रमांच्या चकाकीला भुरळून जाऊन लोकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती.

‘मॅनेज’ करण्याची अफवा ठरली फोल; एजंट भूमिगत!

कारवाईची बातमी समजताच काही गुंतवणूकदारांनी तत्काळ दोडामार्गातील स्थानिक एजंटांकडे धाव घेतली. सुरुवातीला “ही केवळ अफवा आहे, सगळं व्यवस्थित मॅनेज होईल,” असे सांगून एजंटांनी प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारवाईची तीव्रता वाढल्याचे आणि सलग दुसऱ्या दिवशीही संकट कायम असल्याचे समोर येताच, संबधित मुख्य एजंट भूमिगत झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे दोडामार्ग तालुक्यात सध्या तणावाचे आणि चिंतेचे वातावरण असून, गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.