“चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर वैभव खेडेकरही मोठे नेते होऊ शकतात” — आमदार प्रमोद जठार

खेड (प्रतिनिधी) : “भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात सामान्य कार्यकर्त्यालाही मोठी संधी मिळते. चहा विकणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर वैभव खेडेकर हे राज्याचे किंवा देशाचे मोठे नेते का होऊ शकत नाहीत?” असे विधान भाजपचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी केले.
मंगळवारी सायंकाळी खेड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशांच्या पार्श्वभूमीवर वैभव खेडेकर यांच्या राजकीय भवितव्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली.
“वैभव खेडेकर यांना पाहून कुणालाही असे वाटू नये की त्यांच्यामागे पक्षाचे बळ नाही. पक्षाचे पूर्ण लक्ष त्यांच्याकडे आहे आणि लक्ष जावे अशीच ती व्यक्ती आहे. भाजपमध्ये कितीही पक्षप्रवेश झाले तरी वैभव खेडेकर यांना योग्य तो सन्मान द्यायचा, हे प्रदेश भाजप तसेच देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी ठरवलेले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणतीही चिंता करू नये,” असे जठार म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी राजकारणात संयम आणि निष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले. “राजकारणात वेळ आणि काळ महत्त्वाचा असतो. श्रद्धा आणि सबुरी ठेवावी लागते. मला स्वतःला संधी मिळण्यासाठी बारा वर्षे वाट पाहावी लागली. मात्र वैभव खेडेकर यांना बारा वर्षे वाट पाहावी लागेल असे नाही, कदाचित बारा महिन्यांतही मोठी संधी मिळू शकते,” असे ते म्हणाले.
जठार यांच्या या वक्तव्यानंतर खेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, वैभव खेडेकर यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत चर्चांना उधाण आले आहे.