अपेडे येथे कदम फाउंडेशनच्या पुढाकारातून पादचारी लोखंडी पुलाचे लोकार्पण

खेड, प्रतिनिधी :
अपेडे गावातील देऊळवाडी, म्हापारलेवाडी, सुतारवाडी आणि गुलबेवाडी या वाड्यांना जोडणाऱ्या पादचारी लोखंडी पुलाचे लोकार्पण नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कदम फाउंडेशनच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या पुलामुळे परिसरातील ग्रामस्थांची अनेक वर्षांची गरज पूर्ण झाली असून दैनंदिन वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
पावसाळ्यात तसेच अन्य काळात वाड्यांदरम्यान ये-जा करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर कदम फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत लोकहिताचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला. पुलाच्या उभारणीमुळे विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सन २०१७ पासून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविणाऱ्या कदम फाउंडेशनने या पुलाच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी आणखी एक मोलाचे योगदान दिले आहे. लोकार्पण सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष गणपत कदम यांच्यासह रविंद्र कदम, संतोष कदम, दीपक कदम, प्रवीण कदम तसेच फाउंडेशनचे इतर सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका कदम यांनी केले. त्यांनी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत पुलाच्या उभारणीमागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या शेवटी सुभाष म्हापार्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी कदम फाउंडेशनच्या कार्याचे मनापासून कौतुक करत भविष्यातही अशाच लोकहिताच्या उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.