बुधवारी शहरासह ग्रामीण भागातील सर्व मेडिकल दुकाने बंद
चिपळूण (प्रतिनिधी) : ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट (AIOCD) यांच्या देशव्यापी बंदच्या हाकेला चिपळूण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरासह नजीकच्या भागातील सर्व मेडिकल दुकाने बंद ठेवऊन शंभर टक्के सहभाग नोंदविला. बुधवारी (दि. २० मे) चिपळूणमधील बहुतांश औषध दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तर निदर्शने करून ऑनलाइन औषध विक्री निर्णयाचा निषेध केला. ऑनलाईन औषध विक्री बंद करावी, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यवहार्य डिस्काउंटला आळा घालावा तसेच बनावट औषध विक्री रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला होता.
देशपातळीवर बुधवारी हा बंद पुकारण्यात आला होता. चिपळूण तालुक्यातील केमिस्ट व्यावसायिकांनी एकजूट दाखवत या आंदोलनात सहभाग घेतला. या बंदमुळे औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. जिल्हा केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन रत्नागिरी तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली हा बंद यशस्वी करण्यात आला. चिपळूणमधील औषध विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी होत आपला सहभाग नोंदविला आहे. चिपळूण शहरासह खेर्डी, सती-चिंचघरी आदी परिसरातील औषधे विक्रेत्यांचा समावेश होता. यावेळी चिपळूण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रवीण देशमुख, सचिव समीर वाजे, सहसचिव राकेश दाभोळकर, खजिनदार समीर पागार, संदीप गुजर, राजू खरे, महेश बामणे, श्याम पालांडे, राहील परकार, रवी शिंदे, शशांक भिंगारे, अमेय नामुस्ते, तनवीर बेबल, संदीप मोरे, निलेश ढवण, स्वप्नील कासार, पराग पुरोहित, दिगंबर सुर्वे, विजय घोरपडे आदी केमिस्ट आणि पदाधिकारी उपस्थित होते. बंदमध्ये सगळयांनी सहभाग नोंदविल्याबद्दल चिपळूण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने सर्व मेडिकल व्यावसायिकांना धन्यवाद दिले आहेत.












