बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास
नागरिकांकडून स्वागत
राजापूर प्रतिनिधी शहर व शहर बाजारपेठेतील अतिक्रमणे काढून ट टाका अशा नोटीसा वारंवार बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना बुधवारी नगर परिषद प्रशासनाने चांगलाच दणका दिला. मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने शहर व शहर बाजारपेठेतील रस्त्यावरिल सर्व अतिक्रमणे काढून टाकली आहेत.

शासनाकडून लाखो रुपये खर्च करून बनवलेले रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले होते. व्यापारी व रस्त्यावरील विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्यांचा वापर होत नसल्याने शासनाचा निधीही वाया जात आहे. याबाबत वारंवार तक्रारीही करण्यात आल्या होत्या. राजापूर नगरपरिषदेने अखेर बुधवारी धडक मोहीम राबवत अतिक्रमण हटवले. त्यामुळे बाजारपेठेला काही काळ का होईना मोकळा श्वास घेता आला.
गेल्या अनेक दिवसांपासून बाजारपेठेतील मुख्य रस्ते व फुटपाथवर दुकानदारांनी शेड, फलक व साहित्य मांडून अतिक्रमण केले होते. हातगाडी व फेरीवाल्यांमुळे तर पादचाऱ्यांना चालणेही मुश्किल झाले होते. नगरपरिषदेने यापूर्वी वारंवार नोटीसा बजावल्या, मात्र अतिक्रमणधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

अखेर बुधवारी नगरपरिषद प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला. कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम, स्वच्छता व इतर संबंधित विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही धडक मोहीम राबवली. पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने ही धडक कारवाई केली. रस्त्यावर व फुटपाथवर आलेले बेकायदा शेड, पाट्या, स्टॉल, ताडपत्र्या तातडीने हटवण्यात आले. या कारवाईमुळे बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत झाली व नागरिकांना दिलासा मिळाला.
बुधवारी बाजारपेठ मोकळी दिसली असली तरी हा दिलासा तात्पुरता ठरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. यापूर्वीही अशा मोहिमा झाल्या, मात्र दोन तीन दिवसांतच पुन्हा अतिक्रमण होते, असा अनुभव आहे. कायमस्वरूपी तोडगा, नियमित देखरेख व कडक दंडात्मक कारवाई करावी. मात्र आता यात किती सातत्य रहाते, यावरच भविष्यात काही दिवसांत बाजारपेठेचा श्वास पुन्हा गुदमरतो का, याकडे राजापूरकरांचे लक्ष लागले आहे.













