साखलोली येथे इको आणि दुचाकीची भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

दापोली (विशेष प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील साखलोली येथे बुधवारी दुपारच्या सुमारास इको गाडी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, साखलोली येथील वळणदार रस्त्यावरून इको गाडी जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक झाली. रस्त्यावर तीव्र वळण असल्यामुळे दोन्ही वाहन चालकांचा अंदाज चुकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. धडकेचा आवाज मोठा असल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.