रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवस हवामानात बदल होण्याची शक्यता असून हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार १९ मे रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. २० ते २४ मे या कालावधीतही हलका ते मध्यम पाऊस कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत हवामान विभागाच्या संयुक्त विद्यमाने जारी करण्यात आलेल्या हवामान आधारित कृषी सल्ल्यानुसार, या कालावधीत जिल्ह्यात कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७९ ते ८३ टक्के तर दुपारची आर्द्रता ६८ ते ७५ टक्क्यांदरम्यान राहील. त्यामुळे उष्णता आणि दमट वातावरणाचा परिणाम शेती पिकांवर तसेच फळबागांवर होण्याची शक्यता आहे.
हवामानातील या बदलाचा विचार करून कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी विशेष सल्ला जारी केला आहे. मध्यम पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे नव्याने लागवड केलेल्या नारळ, सुपारी रोपे तसेच आंबा व काजू कलमांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना काठ्यांचा आधार देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी भातशेतीतील बांधांची दुरुस्ती, स्वच्छता आणि तणनियंत्रणाची कामे पूर्ण करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
खरीप हंगामाच्या तयारीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी दर्जेदार बियाणे, खते, शेणखत, कीडनाशके आणि इतर कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध करून घ्याव्यात, असे कृषी तज्ज्ञांनी म्हटले आहे. भात लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत, रोपवाटिका तयारी आणि योग्य जातींची निवड यावर भर देण्यात आला आहे. रत्नागिरी, कर्जत, पालघर आदी भागातील कृषी संशोधन केंद्रांमध्ये शिफारस केलेल्या भात बियाण्यांची उपलब्धता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
आंबा उत्पादकांसाठीही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हलका ते मध्यम पाऊस आणि वाऱ्यामुळे परिपक्व आंबा फळांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शक्य तितक्या लवकर फळकाढणी करून ती सुरक्षित व झाकलेल्या ठिकाणी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फळगळ झालेल्या बागांमध्ये खराब फळे गोळा करून नष्ट करावीत, तसेच फळमाशीच्या प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी शिफारस केलेले सापळे वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काढणी पूर्ण झालेल्या बागांमध्ये छाटणी, स्वच्छता आणि बोडो मिश्रणाची फवारणी करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
पशुपालक आणि कुक्कुटपालकांनाही हवामानाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनावरांना स्वच्छ, थंड पाणी उपलब्ध करून द्यावे, दुपारच्या उन्हात चरण्यास सोडू नये तसेच वादळी हवामानात त्यांना झाडाखाली बांधण्याऐवजी सुरक्षित गोठ्यात ठेवावे, असे सांगण्यात आले आहे. कुक्कुटपालन शेडमध्येही पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध ठेवून खिडक्या व्यवस्थित झाकून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, विस्तारित हवामान अंदाजानुसार २४ ते ३० मे दरम्यान कोकण विभागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.













