राजापूर प्रतिनिधी : गेल्या काही दिवसात शहरासह ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या काही संशयीत व्यक्ती, चोरीच्या घटना व भविष्यातील चोऱ्यांचा धोका या पार्श्वभूमिवर राजापूर पोलीसांकडून शहरासह ग्रामीण भागातील जनतेला तसेच व्यापारी, आंबा बागायतदार यांना सतर्क व सावध रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी याबाबत एक प्रसिध्दी पत्रक जारी करत जनतेला सतर्क रहाण्याचे व पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कोकणातील आंबा हंगाम संपल्यानंतर परजिल्हा, पर राज्य वा नेपाळ या भागातुन आलेले कामगार आपल्या गावी परत जात असताना काही ठिकाणी चोरी, घरफोडी किंवा संशयास्पद हालचालींची शक्यता निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमिवर व्यापारी, आंबा बागायतदार व जनतेने पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी असे आवाहन यादव यांनी केले आहे.
आंबा बागायतदारांनी आपल्या बागेत कामावर ठेवलेल्या सर्व कामगारांची पूर्ण माहिती, फोटो, मोबाईल क्रमांक व ओळखपत्राची प्रत जतन करून ठेवावी. कामगार गाव सोडत असताना त्यांची नोंद ग्रामपंचायत किंवा स्थानिक पोलिस पाटील यांच्याकडे द्यावी. बागेत किंवा घराजवळील मौल्यवान वस्तू, रोख रक्कम, दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. घर, गोदाम, आंबा पेट्या साठवण जागा यांना मजबूत कुलूप लावावे. रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तींना बागेत किंवा वस्तीवर थांबू देऊ नये. कामगारांना थकीत मजुरी, व्यवहार व्यवस्थित करूनच निरोप द्यावा, वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. गाव सोडून बाहेर जाताना शेजाऱ्यांना व पोलिस पाटील यांना माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.
तर शहरासह ग्रामीण भागातील जनतेने पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, यामध्ये गावात अनोळखी किंवा संशयित व्यक्ती दिसल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी. रात्रीच्या वेळी गावात गस्त किंवा सामूहिक पहारा आयोजित करावा. घर बंद ठेवून बाहेर जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी. सोशल मीडियावर “घर बंद आहे”, “गावी नाही” अशी माहिती टाकणे टाळावे. एकटे राहणारे वृद्ध नागरिक यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. गावातील रिकामे घरे, शाळा, देवस्थान परिसर येथे संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित कळवावे. अफवा पसरवू नयेत; कोणतीही माहिती खात्री करूनच पुढे द्यावी असे आवाहन यादव यांनी केले आहे.
तर कोणतीही संशयास्पद हालचाल, चोरी किंवा घरफोडीबाबत माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या राजापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर माहिती द्यावी असेही आवाहन अमित यादव यांनी केले आहे.
Home महत्वाच्या बातम्या राजापुरात वाढता संशयितांचा वावर; “सतर्क राहा, पोलिसांना सहकार्य करा” – निरीक्षक अमित...












