कोदवलीच्या शंकरेश्वर मंदिरात आढळले ब्रिटिश काळातील तीन शिलालेख

जीर्णोद्धार, कालगणना आणि बंदर प्रशासनाचे ऐतिहासिक संदर्भ उजेडात

१८४४-४५ मधील नोंदींमुळे इतिहास संशोधनाला नवी दिशा

राजापूर प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील कोदवली येथील प्राचीन श्री शंकरेश्वर महादेव मंदिरात मराठाकालीन तीन महत्त्वपूर्ण शिलालेख आढळून आले असून, या शोधामुळे स्थानिक इतिहास, धार्मिक परंपरा आणि तत्कालीन सामाजिक-प्रशासकीय व्यवस्थेवर नवे प्रकाशझोत पडले आहेत. मंदिराच्या विविध भागांमध्ये कोरलेले हे शिलालेख शके १७६६ ते १७६७ अर्थात इ.स. १८४४-४५ या कालखंडातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या शिलालेखांचे संशोधन इतिहास अभ्यासक श्री. विनोद मनोहर पवार यांनी केले असून, शिलालेखांचे वाचन श्री. अनिल किसन दुधाणे यांनी केले आहे. कोदवली मांडवकरवाडी येथील गणेश मांडवकर यांचेही या कार्यात विशेष सहकार्य लाभले.

मंदिराच्या जीर्णोद्धाराचा ऐतिहासिक पुरावा

पहिला शिलालेख मंदिराच्या गाभाऱ्याच्या उजव्या भिंतीवर कोरलेला असून तो आठ ओळींचा आहे. या लेखात “श्री शंकरेश्वर देवालयाचे काम सिद्धेश्वर बाबा गोसावी यांनी केले होते, ते जीर्ण झाल्याने त्याचा जीर्णोद्धार चिमणाजी हाणमाजी बोर्वणकर यांनी केला,” अशी स्पष्ट नोंद आहे.

या लेखात “पंतकी बंदर वीस राजापूर” असा उल्लेख आढळतो. यावरून चिमणाजी हाणमाजी बोरवणकर यांचा संबंध तत्कालीन बंदर प्रशासन किंवा किनारी कारभाराशी असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा जीर्णोद्धार शके १७६६, क्रोधी संवत्सर, माघ शुद्ध दशमी, रविवार या शुभ मुहूर्तावर करण्यात आल्याची नोंद असून, त्याची इंग्रजी तारीख १६ फेब्रुवारी १८४५ अशी ठरते.

गोमुख कुंडाजवळ दुसरा शिलालेख

दुसरा शिलालेख मंदिराच्या बाह्य भागातील गोमुख कुंडाच्या वारीमार्गावरील पायऱ्यांच्या भिंतीवर कोरलेला आहे. पाच ओळींच्या या लेखात “जीर्णोद्धार श्री शंकरेश्वर चरणी चिमणाजी हाणमाजी बोरवणकर” असा उल्लेख असून, हा लेख शके १७६६, मार्गशीर्ष वद्य द्वितीया, गुरुवार या दिवशी कोरल्याचे नमूद आहे. आधुनिक कालगणनेनुसार ही तारीख २६ डिसेंबर १८४४ ठरते.

या लेखातील “पतकी बंदर” आणि “राजापूर” या उल्लेखांवरून बोरवणकर घराण्याचा राजापूर परिसरातील बंदर व्यवस्थेशी संबंध असावा, असे संशोधकांचे मत आहे.

प्रवेशद्वारावरील तिसरा शिलालेख विशेष महत्त्वाचा

तिसरा शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आतील डाव्या भिंतीवर लावण्यात आलेला आहे. या लेखात “स्वस्ति श्री नृप शालिवाहन शके १७६७ विश्ववसु नाम संवत्सरे” अशी सुरुवात असून, श्रावण शुद्ध पंचमी, शुक्रवार, हस्त नक्षत्र या शुभ मुहूर्ताची अचूक कालनोंद करण्यात आलेली आहे.

लेखात “श्री शंकरेश्वर चरणी तत्पर चिमणाजी हाणमाजी बोरवणकर” असा उल्लेख असून, “देव हस्ते वामनाजी आबाजी बोरवणकर साष्टांग प्रणाम” अशी भक्तिपूर्ण नोंदही कोरलेली आहे. या लेखाची इंग्रजी तारीख ८ ऑगस्ट १८४५, शुक्रवार अशी निश्चित करण्यात आली आहे.

कालगणना आणि ज्योतिषविद्येचा उत्कृष्ट नमुना

या तिन्ही शिलालेखांमध्ये तिथी, वार, नक्षत्र, पळे आणि कला यांसारखी सूक्ष्म कालनोंद देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या काळातील पंचांगविद्या, ज्योतिषशास्त्र आणि भारतीय कालमापन पद्धती किती विकसित होती, याचा महत्त्वपूर्ण पुरावा या लेखांमधून मिळतो.

विशेष म्हणजे “पळे” आणि “कला” यांसारख्या सूक्ष्म कालमापन एककांचा वापर करण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, शुभ मुहूर्त अचूक नोंदविण्याची तत्कालीन परंपरा या शिलालेखांतून स्पष्ट दिसते.

स्थानिक इतिहासाचा अमूल्य ठेवा

हे शिलालेख केवळ धार्मिक नोंदी नसून मराठाकालीन समाजजीवन, स्थानिक प्रशासन, बंदर व्यवस्था, श्रद्धा आणि प्रतिष्ठित घराणी यांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरत आहेत. ब्रिटिश आमदनीच्या काळातील कोकणातील सामाजिक आणि धार्मिक वास्तव समजून घेण्यासाठी या लेखांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

इतिहास अभ्यासकांच्या मते, अशा शिलालेखांचे जतन, संवर्धन आणि शास्त्रीय दस्तऐवजीकरण होणे अत्यंत आवश्यक असून, कोदवली येथील शंकरेश्वर मंदिर हा स्थानिक सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे.

 

“कोदवली येथील तिन्ही शिलालेख राजापूर परिसरातील श्री शंकरेश्वर देवालयाच्या इतिहासाशी संबंधित महत्त्वपूर्ण पुरावे आहेत. या लेखांमधून मंदिराचा जीर्णोद्धार, तत्कालीन धार्मिक श्रद्धा आणि बोरवणकर घराण्याचे योगदान स्पष्टपणे समोर येते. शिलालेखांनुसार देवालयाचे मूळ बांधकाम सिद्धेश्वर बाबा गोसावी यांनी केले होते. पुढे मंदिर जीर्ण झाल्यानंतर चिमणाजी हाणमाजी बोरवणकर यांनी त्याचा जीर्णोद्धार केला. लेखांमध्ये शालिवाहन शक, तिथी, वार, नक्षत्र, पळे आणि कला यांसह अचूक कालनोंद देण्यात आलेली असून त्या काळातील ज्योतिषाधारित कालगणनेची विकसित परंपरा दिसून येते. ‘पतकी बंदर’ या उल्लेखावरून बोरवणकर घराण्याचा स्थानिक बंदर प्रशासन किंवा मानद पदाशी संबंध असावा, असे जाणवते. हे शिलालेख मराठाकालीन धार्मिक श्रद्धा, मंदिरसंवर्धन आणि स्थानिक इतिहासाचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहेत.”

— अनिल दुधाणे, इतिहास संशोधक, पुणे