आंबा घाटात टँकरचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

मात्र घाटातील वाहतूक सुरळीत

देवरूख (प्रतिनिधी)

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील प्रसिद्ध आंबा घाटात शाहूवाडी (जि. कोल्हापूर) हद्दीत काल रात्री एका टँकरचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र, या अपघातानंतर सोशल मीडियावर ‘आंबा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद आहे’ अशा प्रकारच्या अफवा वेगाने पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर, घाटातील वाहतूक पूर्णपणे सुरू आहे.
​
​मंगळवारी रात्रीच्या सुमारास आंबा घाटातील शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने टँकरला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की यामध्ये एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. सकाळपासूनच सोशल मीडियावर “टँकर अपघातामुळे आंबा घाटातील वाहतूक ठप्प”, “घाट रस्ता बंद” अशा स्वरूपाचे मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत होते. यामुळे कोकणात जाणार्‍या आणि कोकणातून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

​याबाबत सत्यता जाणून घेण्यासाठी साखरपा पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधला असता, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला आहे हे सत्य आहे, मात्र हा अपघात कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत झाला आहे. अपघातामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. आज दिवसभर आणि आता सायंकाळपर्यंत आंबा घाटातील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे सुरक्षित आणि सुरळीत सुरू आहे.