राजापूर (वार्ताहर): आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ राजकीय आणि सामाजिक कार्याचा विस्तार न करता पर्यावरणाचा समतोल राखताना कृषी समृद्धीला चालना देण्याच्या उद्देशाने राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या सर्व शाखाप्रमुखांना फळशेतीकडे प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांना प्रत्येकी पाच फणस फळझाडांचे वाटप केले जाणार आहे.
‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’ या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा येत्या मंगळवार २ जून रोजी पाचल येथे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये शुभारंभ होणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक नागले यांनी दिली. या कार्यक्रमामध्ये शिवसेना शाखाप्रमुखांना फणसाच्या फळझाडांचे वाटप केले जाणार असून त्यामध्ये स्थानिक हवामानाला पूरक असलेल्या आणि भविष्यात चांगले उत्पन्न मिळवून देणार्या दर्जेदार फळझाडांच्या कलमांचा समावेश असल्याचे श्री. नागले यांनी यावेळी स्पष्ट केले.
राजापूर-लांजा-सखरपा विधानसभा मतदारसंघामध्ये ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. केवळ घोषणा करून पर्यावरण सुधारणार नाही तर त्यासाठी प्रत्येकाने प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे आहे. आपले शाखाप्रमुख हे तळागाळातील जनतेशी जोडलेले असतात. त्यांनी स्वतः आपल्या अंगणात किंवा शेतात ही झाडे लावून फळशेतीची सुरुवात केल्यास संपूर्ण गावासाठी तो एक आदर्श ठरेल असा विश्वास आमदार श्री. सामंत यांनी व्यक्त केला आहे.
विविध कारणांमुळे वाढत्या जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. त्याचवेळी खर्चाच्या तुलनेमध्ये उत्पन्न कमी मिळत असल्याने युवा पिढीकडून शेतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा स्थितीमध्ये कार्यकर्त्यांना थेट निसर्गाशी आणि शेतीशी जोडणारा नाविण्यपूर्ण उपक्रण आमदार श्री. सामंत यांच्यातर्फे विधानसभा मतदारसंघामध्ये राबविला जात असून त्याचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
Home महत्वाच्या बातम्या आमदार किरण सामंत यांच्याकडून ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती










