बाळकृष्ण पेडणेकर ७३ व्या स्थानावर!
ठाणे । प्रतिनिधी :
विहंग कुलकर्णी चेस फाउंडेशनतर्फे आणि ठाणे जिल्हा चेस असोसिएशनच्या सहकार्याने ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. सावंतवाडीचा अव्वल बुद्धिबळ खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने या स्पर्धेत ७३ वा क्रमांक पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढवला. त्याच्या या यशाबद्दल त्याला रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भारतातील विविध राज्यांतून सुमारे ४९८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, यामध्ये तब्बल ३१४ आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंचा समावेश होता. अशा तगड्या स्पर्धकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुक्ताई ॲकेडमीचा खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, तसेच मालवण येथील मयुरेश परुळेकर आणि मयुरेश मालवणकर यांनी उत्कृष्ट खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेत बाळकृष्णने एकूण ९ राऊंड्सपैकी ५ राऊंड्समध्ये विजय मिळवला, तर २ राऊंड्स बरोबरीत सोडवले. एकूण ६ गुणांसह त्याने स्पर्धेत ७३ वा क्रमांक मिळवला. दुसरीकडे, व्हिज्युअली चॅलेंज्ड विद्यार्थी मयुरेश परुळेकर याने आपल्या कौशल्याच्या जोरावर ९ राऊंड्समध्ये ४ राऊंड्स जिंकले आणि १ राऊंड बरोबरीत सोडवून साडेचार गुण मिळवले. या कामगिरीमुळे मयुरेशच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये २७ गुणांची घसघशीत वाढ झाली आहे.
मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक श्री. कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. ॲकेडमीच्या उपाध्यक्षा सौ. स्नेहा पेडणेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सर्व स्तरातून या बुद्धिबळपटूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.













