या कार्यक्रमांमध्ये सेवाभावी वृत्तीने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवा
आमदार प्रमोद जठार यांचे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन
निलेश जाधव / देवरूख:
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा १२ वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याबद्दल संगमेश्वर तालुका भाजपाच्या वतीने दि. दि. २६ मे ते दि. २५ जून या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या कार्यक्रमांच्या पार्श्वभुमीवर भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी देवरूख येथे मंगळवारी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये सेवाभावी वृत्तीने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवा, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीने सगळीकडे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुका भाजपतर्फेसुध्दा यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये दि. ५ जून रोजी तालुक्यात वृक्षलागवड करण्यात येणार आहे. दि. ६ रोजी गडकिल्ले स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. दि. ८ ते १४ जून या कालावधीत तब्बल ५०० जेष्ठ नागरिकांची भेट घेवून त्यांचा भेटवस्तू (पुस्तके) देवून सन्मान केला जाणार आहे. दि. १२ रोजी बुध्दीजीवी व्यक्तींचे देवरूख येथील सद्गुरू लोकमान्य वाचनालय येथे संमेलन घेण्यात येणार आहे. चित्रकला, निबंध स्पर्धा व प्रदर्शन भरवले जाणार आहे. दि. २१ रोजी योगदिन साजरा केला जाणार आहे. दि. २५ रोजी आणीबाणीमधील व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांच्या पार्श्वभुमीवर आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी देवरूख येथे भाजप कार्यालयाला भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी राबवलेल्या योजना घराघरात जावून पोहचवा असे सांगून मोदीजी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या सर्व कार्यक्रमांमध्ये सेवाभावी वृत्तीने सहभागी होवून हे मिशन यशस्वी करावे, असे सांगितले. यावेळी त्यांचा तालुका भाजपतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, विनोद म्हस्के, तालुका उपाध्यक्ष विजय गुरव, तालुका सरचिटणीस सचिन बांडागळे, माजी उपनगराध्यक्ष निलेश भुरवणे, देवरूख शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये, शंकर मालप , सदानंद राजवाडे, संतोष केदारी, डाँ. अमित ताठरे, धोंडू करंबेळे, नगरसेवक रूपेश भागवत, पं. स. सदस्या दुर्वा पाष्टे, नगरसेविका श्रध्दा इंदुलकर, समृद्धी वेलवणकर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा वैदेही बने, दिगंबर पाष्टे, संजय नटे, दिनेश गुरव, संजय अणेराव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.













