लांजा वनविभागाकडून शिरवली येथील भातशेती आणि बागांच्या नुकसानीची पाहणी

शिरवली येथे गव्यांनी केली होती काजूबाग आणि भातशेतीचे नुकसान

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरवली येथे रानगव्यांकडून करण्यात आलेल्या भातशेती आणि शेतकऱ्यांच्या बागायतीच्या नुकसानीची लांजा वनविभागाचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
तालुक्यातील शिरवली येथे रानगव्यांनी येथील शेतकऱ्यांच्या भातशेती आणि काजू बागांचे नुकसान केले होते. यामुळे या ठिकाणी वनविभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी ,अशी मागणी येथील स्थानिक शेतकरी दीपक मोडक आणि ग्रामस्थांनी केली होती. या पार्श्वभूमीवर लांजा वनविभागाचे वनपाल दिलीप आरेकर तसेच संबंधित वनरक्षक यांनी शिरवली येथे जाऊन या घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली.

याबाबत वनपाल दिलीप आरेकर यांनी सांगितले की, आपण या घटनेची पाहणी केली असून येथील किसन बाळू कुळये यांची काजूची आठ झाडे यांचे नुकसान केले आहे .याबाबत घटनेचा पंचनामाचा, कागदपत्रे तयार केली आहेत. मात्र या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही शेतकऱ्यांच्या भातशेती व अन्य बागायतीचे नुकसान गव्यांकडून झालेले नाही. मात्र या परिसरात रानगव्यांचा वावर असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आगामी काळात रानगव्यांकडून नुकसान झाल्यास वनविभागाकडे याबाबतची माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे. शिरवली गावचे पोलीस पाटील यांना देखील संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर वनविभागाला कळवून शेतकऱ्यांना अर्ज देणे बाबत माहिती दिलेली आहे. तसेच शिरवली गावचे सरपंच व सामाजिक कार्यकर्ते दीपक मोडक यांच्याशी देखील संपर्क साधून केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देऊन व नुकसानीच्या घटना घडल्यास वनविभागाची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे असे वनपाल दिलीप आरेकर यांनी सांगितले.