दोडामार्ग | सुहास देसाई
तालुक्यात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. पहिल्याच मोठ्या पावसामुळे अनेक दिवसांच्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणि विशेषतः बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, पहिल्याच पावसात तालुक्याची पायाभूत सुविधांची दैना उघडी पडली असून, कसई दोडामार्ग ते तिलारी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा, पण दोडामार्गची बत्ती गुल
गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. आज अचानक वातावरणात बदल होऊन विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. या पहिल्याच जोरदार पावसामुळे शेतीकामांना वेग येणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, पावसाची पहिलीच सर कोसळताच कसई दोडामार्ग आणि परिसरातील काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. ऐन पावसात वीज गायब झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.
रस्त्यावर काम सुरु असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल होत आहे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे
तालुक्यात सुरू असलेल्या रस्ते कामाच्या रेंगाळलेल्या गतीचा आणि संथ कारभाराचा फटका पहिल्याच पावसात सर्वसामान्यांना बसला. दोडामार्ग ते विजघर राज्यमार्गाच्या सुरू असलेल्या काँक्रीटीकरण आणि रस्ता रुंदीकरणाच्या संथ कामामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.
रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे मुख्य बाजारपेठ आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. या चिखलातून वाट काढताना दुचाकी चालक आणि पादचारी प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
अपघातांचे सत्र; पर्यायी व्यवस्थेची मागणी
पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने आणि रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने तालुक्यात काही ठिकाणी किरकोळ अपघातांच्या घटना घडल्या. रस्त्यांचे काम रखडलेले असताना प्रशासनाने योग्य पर्यायी वाहतूक व्यवस्था किंवा सुरक्षेचे उपाय न केल्यामुळे हे अपघात घडत असल्याचा संताप स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रशासनाने रस्ते काम आणि वीज यंत्रणा लवकरात लवकर पूर्ववत करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.













