चिपळूणमध्ये पान टपरीवर सुमारे ७ हजार रुपयांचा गुटख्याचा साठा पकडला

अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई; एका विरोधात गुन्हा दाखल

चिपळूण (प्रतिनिधी):– राज्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाचा आयुक्त पदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर हा विभाग ॲक्शन मोडवर आला असून राज्यात ठीकठिकाणी भेसळ प्रकार उघडकीस येत असताना बेकायदा गुटख्याचा साठा देखील पकडला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन विभाग देखील सतर्क झाला असून या विभागाने चिपळूण शहरातील बाजारपेठेमधील पान टपरीवर छापा टाकत ७ हजार ५४६ रुपयांचा साठा पकडला आहे. या कारवाईने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

राज्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा कार्यभार तुकाराम मुंडे यांनी स्वीकारल्यानंतर हा विभाग ॲक्शन मोडवर आला असून राज्यात ठीकठिकाणी अन्न भेसळ आणि प्रतिबंधित गुटखा विक्रीविरोधात धडक मोहीम राबवली आहे. अवघ्या सहा- सात दिवसांत राज्यभरात २०२ ठिकाणी धाडी टाकून १०२ जणांना अटक करण्यात आली आहे, तसेच १.५८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने अन्नभेसळ व गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात देखील गुटखा विक्रेत्यांवर कारवाईला सुरुवात झाली असून चिपळूण शहरातील गांधी चौक बाजारपेठ येथील स्वामी जनरल पान स्टोअर्स टपरीवर अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत या पान टपरीमध्ये ७ हजार ५४० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सापडला आहे. ही कारवाई अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी भाग्यश्री परदेशी यांनी केली आहे. याप्रकरणी प्रवीण सदानंद बांदेकर( वय ५३, रा. कापसाळ चिपळूण) यांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून गुटखा विक्रीला बंदी असताना देखील चिपळूण मध्ये सरासपणे गुटखा विक्री होत असल्याची जोरदारपणे चर्चा सुरू आहे. मात्र इतकी कारवाई होताना दिसत नव्हती. परंतु, आता अन्न औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन विभाग देखील सतर्क झाले आहे. या विभागाकडून गेल्या काही दिवसात गुटखाप्रकरणी कारवाई होताना दिसत आहेत. या कारवाया अशा सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा जागरूक नागरिकांमधून केली जात आहे.