वेंगुर्ले : प्रतिनिधी
तुळस नदीवरील ब्रिज कम बंधारा रात्रीच्या पावसामुळे अचानक मधून कोसळला. रब्बी हंगामामध्ये या बंधाऱ्याचा फायदा आजुबाजूच्या शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे पुढील रब्बी हंगामापूर्वी या बंधाऱ्याच्या जागी नवीन बंधारा उभा राहावा. अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी यांच्याकडून होत आहे.
तुळस येथील या बांधाऱ्यामुळे जवळजवळ तुळस व मातोंड भागातील शेतकरी रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात शेती करीत असतात. तुळस भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन या बंधाऱ्याची मंजुरी घेण्यात आलेली आहे, परंतु प्रशासनाने याची आतापासूनच तात्काळ दखल घेऊन रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी लक्ष घालावा. या बंधार् याच्या पाण्यामुळे भुईमूख, नाचणी, मिरची, चवळी व त्या व्यतिरिक्त आंतरबाह्य पिके शेतकरी घेत असतात. त्यामुळे प्रशासनाला छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष श्यामसुंदर राय यांच्या वतीने विनंती आहे, की हे काम तत्काळ हाती घेऊन ते पूर्ण करावे. हे काम लघुपाट बंधारे यांच्याकडे आहे. या कामाला मंजुरी मिळाली असे सांगितले जाते, परंतु याचे अधिकृत पत्र अजून तुळस ग्रामपंचायतीला आलेले नाही. दरम्यान तुळस गावचे सुपुत्र आणि पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी या नूतन बंधाऱ्याचे काम पूर्ण करून घ्यावे अशी मागणी गावातून होत आहे.













