‘गारंबीचा बापू’ पुन्हा रुपेरी पडद्यावर!

दापोली | प्रशांत कांबळे:

मराठी साहित्यातील अजरामर कलाकृतींपैकी एक असलेली ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा सध्या जोरात रंगू लागली आहे. कोकणातील ग्रामीण जीवन, मानवी स्वभावातील गुंतागुंत, नातेसंबंधांचे वास्तव आणि समाजव्यवस्थेचे सूक्ष्म चित्रण यामुळे ‘गारंबीचा बापू’ हे नाव मराठी वाचकांच्या मनात आजही तेवढ्याच आदराने घेतले जाते.

साहित्यकृतींच्या चित्रपट रूपांतराचा प्रवास नेहमीच आव्हानात्मक मानला जातो. मात्र गारंबीचा बापू ही केवळ एक कथा नसून कोकणच्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि मानवी भावविश्वाचे जिवंत दस्तावेज आहे. त्यामुळे या कलाकृतीचे नव्या तंत्रज्ञानाच्या आणि आधुनिक सिनेमाच्या माध्यमातून होणारे पुनरागमन हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे.

‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी आणि दापोली यांचा एक अतूट संबंध आहे. १९७० – ८० च्या दशकात याच कादंबरी वर आधारित प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण दापोली परिसरातच झाले होते. शिवाय दापोलीतील मुर्डी हे गाव श्री. ना. पेंडसे यांचं मूळ गाव असल्याने या कांदंबरीत देखील बरेचसे स्थानिक संदर्भ वाचायला मिळतात. कोकणातील ग्रामीण जीवन, तिथल्या मानवी स्वभावातील गुंतागुंत, नातेसंबंधांतील वास्तव आणि इथल्या समाज व्यवस्थेचे सूक्ष्म दर्शन या कादंबरीतून होते. अशा या अत्यंत गाजलेल्या कादंबरीच्या चित्रपट रूपांतराचा मोह अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांना याआधी देखील झालाच आहे. पण आता नव्या दमाच्या चित्रपटकर्मीना हा मोह होणे, हे विशेष कौतुकाचं आहे. नव्या दमाचे दमदार दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले गुरुप्रसाद इनामदार या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत, तर, त्यांच्याच ‘गुरुप्रसाद फिल्म्स’ या बॅनर खाली हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे. या चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी दापोलीतील हरहुन्नरी कलाकार आणि स्वतः श्री. नांचे नातू असलेले शशी पेंडसे हे सांभाळत आहेत. हे या चित्रपटाचे दापोलीकरांसाठीचे महत्वाचे आकर्षण असणार आहे. नुकतेच या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध झालंय.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये धगधगती आग आणि त्या आगीच्या ज्वाळांसमोर दोन हातांनी दरवाजाचे खांब घट्ट पकडून उभा असलेला एक बलदंड व्यक्ती पाठमोरी दिसत आहे. त्याची ही भेदक पाठमोरी आकृती आणि आग चित्रपटातील संघर्षाची तीव्रता दाखवून देते. त्यातच पोस्टरवरील ‘गोष्ट एका वाघाची’ ही टॅगलाईन चित्रपटाच्या कथानकाच्या भव्यतेला साजेशी आहे.

तर, या पोस्टर मधील पाठमोरी व्यक्ती ही अर्थातच चित्रकथेतील मुख्य नायक असलेल्या बापू याचीच आहे. या आगामी चित्रपटातील ‘बापू’च्या मध्यवर्ती भुमिकेत प्रथितयश कलाकार श्री. अंगद म्हसकर हे दिसणार आहेत.
आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात ग्रामीण जीवनाचे वास्तव, माणसांमधील भावनिक गुंतवणूक आणि निसर्गाशी असलेले नाते पडद्यावर क्वचितच दिसून येते. अशा काळात गारंबीचा बापू सारखी कथा नव्या पिढीसमोर येणे ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी सकारात्मक बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे दापोली आणि परिसराशी निगडित असलेल्या या कथेमुळे कोकणच्या पर्यटनालाही नवसंजीवनी मिळू शकते.

साहित्य आणि सिनेमा यांचा संगम घडवणारे असे प्रयत्न केवळ कलाक्षेत्र समृद्ध करत नाहीत, तर समाजाला स्वतःच्या सांस्कृतिक मुळांची जाणीव करून देतात. त्यामुळे गारंबीचा बापू चे रुपेरी पडद्यावरील पुनरागमन हे एका चित्रपटाचे पुनरागमन नसून कोकणच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव करणारा महत्त्वाचा क्षण ठरणार आहे.

मराठी साहित्याच्या सुवर्णपानांवर अजरामर ठरलेली ही कथा आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार असल्याने साहित्यप्रेमी, चित्रपट रसिक आणि कोकणवासीयांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘गारंबीचा बापू’ पुन्हा एकदा पडद्यावर येत असताना, कोकणच्या मातीचा सुगंध आणि मराठी संस्कृतीची श्रीमंती नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकणातील कलाकारांनाही या चित्रपटात सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. जे अनुभवी आणि इच्छुक असतील त्यांनी मोबाईल क्रमांक 8605164201 वर संपर्क करावा.