न.प.कडून मृत माशांची विल्हेवाट
बोट फिरवून काढले मृत मासे; तपासणीसाठी पाणी नमुने घेणार
चिपळूण (प्रतिनिधी) : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला विरेश्वर तलावालातील मासे अचानकपणे मृत झाल्याची घटना खळबळजनक सोमवारी उघडकीस आली. नगरपरिषदेकडून तलावात बोट फिरवून हे मासे पाण्याबाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. हे मासे कोणत्या कारणास्तव मृत पावले असावेत याचा शोध घेतला जात असून त्यासाठी तलावातील पाणी नमुने देखील घेण्यात आले आहे. दरम्यान, निसर्ग, पक्षीप्रेमींनी याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
विरेश्वर तलावाची जपणूक व्हावी यासाठी काही वर्षापूर्वी या तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले होते. यातूनच हे तलाव एकप्रकारे शहराच्या वैभवात भर टाकणारे ठरले होते. काही दिवस जाता तलावाची देखभाल न झाल्याने या तलावाची पडझड झाली आहे. या तलावात मगर, मासे, कासवे मोठ्या प्रमाणात आहेत. नुकतीच या तलावाची स्वच्छता करण्यात आली आहे. यातूनच झाडी-झुडपाने वेढलेला हा तलाव चकाचक दिसू लागला आहे. असे असताना सोमवारी अचानकपणे तवालातील मासे मृत होऊन ते पाण्यावर तरंगताना आढळून आले. या प्रकाराची नगरपरिषदेकडून तात्काळ दखल घेत तलावात बोट फिरवून हे मासे पाण्याबाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्यात आली असून हे मासे कोणत्या कारणास्तव मृत पावले याचा शोध घेतला जात आहे.
चौकट-
सीसीटीव्हीची मागणी
गतवर्षीदेखील अशाच पद्धतीने अचानकपणे तलावातील मासे मृत झाले होते, या प्रकारानंतर त्या पाण्यावर एखादा द्रव पसरल्याचे चित्र दिसून येत होते. शिवाय पाण्याचा रंगदेखील लाल झाला होता. या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याने निसर्ग, पक्षीप्रेमींमध्ये याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. तलावाठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होत आहे.













