सावर्डे मंडल अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार; बदली करावी- प्रणय चव्हाण यांची मागणी

चिपळूण (प्रतिनिधी) : महसूल विभागाचे सावर्डे मंडल अधिकारी अनिल जाधव मनमानी कारभार करीत असून याचा फटका पालकांसह विद्यार्थ्यांना बसत आहे. तरी या प्रकरणाची चौकशी होऊन या मंडल अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सावर्डे जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख प्रणय चव्हाण यांनी आ. शेखर निकम यांच्याकडे केली आहे.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे हा शैक्षणिक हब असून येथील लोकांना उत्पन्न दाखले, संमत्तीपत्र, प्रतिज्ञापत्र व अन्य महसूल विभागाच्या संबंधित व्यवहार करताना महसूल अधिकारी अनिल जाधव दादागिरी, मनमानी करून त्यात त्रुटी काढून त्यांना खेटे मारायला लावत आहेत. याचा परिणाम स्थानिक लोकांना चिपळूण तहसिल कार्यालयात जावे लागत असून नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या सर्वामागे आर्थिक समीकरण दडली असून, या सर्कल अधिकाऱ्याची चोकशी करून बदली करण्यात यावी, अशी मागणी प्रणय चव्हाण यांनी केली आहे. तसेच शासनाने सर्कल यांना काही महसुली अधिकार दिले आहेत. याचा ते गैरवापर करीत असल्याचे प्रणय चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सावर्डे सर्कल यांच्याकडे दहिवली खुर्द, बुद्रुक, हडकणी, डेरवण, फुरुस आदी गाव असल्याने सावर्डे येथे असणाऱ्या महा ई सेवेत मोठं काम असून सर्कल अनिल जाधव सावर्डे येथील कार्यक्षेत्रात राहत नाहीत. यामुळे सर्कल कार्यालयात बऱ्याचदा अनुपस्थित असतात. यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. तरी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन अनिल जाधव यांची बदली करावी, अशी मागणी प्रणय चव्हाण यांनी केली आहे.