पणदुर–अणाव–सुकळवाड मार्गावरील धोकादायक वळणांवरील झाडी हटविली; वाहनधारकांना मोठा दिलासा

आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर कार्यवाही; विनायक अनावकर यांच्या पाठपुराव्याला यश

कुडाळ :-पणदुर–अणाव–सुकळवाड या महत्त्वाच्या मार्गावरील श्री स्वामी समर्थ मठ परिसरासह अनेक धोकादायक वळणांवर वाढलेल्या झाडीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. विशेषतः अरुंद वळणांवर समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला होता. या गंभीर समस्येची दखल घेत रस्त्यालगतची झाडी हटविण्याचे काम पूर्ण करण्यात आल्याने वाहनधारक, शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

स्थानिकांच्या मते, हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा करत सन्माननीय आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. या पाठपुराव्यात माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक अनावकर यांनी विशेष पुढाकार घेत संबंधित विभागाचे वारंवार लक्ष वेधले आणि धोकादायक ठिकाणांवरील झाडी हटविण्याची मागणी लावून धरली होती.

या मागणीची गांभीर्याने दखल घेत आमदार निलेश राणे यांनी संबंधित ठेकेदारास तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार रस्त्यालगत वाढलेली झाडी आणि अडथळे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत विनायक अनावकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून काम पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

झाडी हटविल्यानंतर रस्त्यावरील वळणे स्पष्टपणे दिसू लागली असून वाहनचालकांना सुरक्षितपणे प्रवास करणे शक्य झाले आहे. त्यामुळे अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होणार असल्याचे वाहनधारकांनी सांगितले. विशेषतः दुचाकीस्वार, शालेय वाहने तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना या कामाचा मोठा लाभ होणार आहे.

या उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी आमदार निलेश राणे तसेच विनायक अनावकर यांचे आभार व्यक्त केले असून भविष्यातही अशाच प्रकारे रस्ते सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.