जागतिक महिला दिनानिमित्त कुडाळात “जागर स्त्री शक्तीचा”; विविध स्पर्धा, सन्मान सोहळा आणि आकर्षक बक्षिसांची मेजवानी

महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे :महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांचे आवाहन

स्वप्निल कदम l कुडाळ :जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुडाळ येथे महिलांसाठी विविध उपक्रमांनी भरलेला “जागर स्त्री शक्तीचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना महिला सेना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघासाठी हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सोमवार, दि. ९ मार्च रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत हा सोहळा रंगणार आहे. कुडाळ पोस्ट ऑफिसजवळील श्री सिंधुदुर्गचा राजा मैदान येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सन्मान सोहळा तसेच आकर्षक बक्षिसांची लकी ड्रॉ योजना ठेवण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा जि.प. सदस्या सौ. दीपलक्ष्मी पडते यांनी आज कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.

कुडाळ येथील महायुती संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सौ. पडते बोलत होत्या. यावेळी नगरसेविका चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, रेवती राणे आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाबाबत माहिती देताना सौ. पडते म्हणाल्या की, या कार्यक्रमाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते होणार असून आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून महिला ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण होणार आहे. तसेच महिलांसाठी पाककला स्पर्धा, उखाणे स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. निमंत्रित ग्रुप डान्सचा नृत्याविष्कारही सादर करण्यात येणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी “खेळ पैठणीचा” हा विशेष कार्यक्रमही होणार असून प्रथम क्रमांकासाठी पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी सोन्याची नथ आणि तृतीय क्रमांकासाठी चांदीचा करंडा अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून उपस्थित सर्व महिलांना सौभाग्यवाण भेट देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात खाऊगल्लीत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच शॉपिंग स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. रात्री आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार असल्याने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे. कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आला असून मिक्सर, पंखा, इलेक्ट्रिक केटल, कढई आदी घरगुती वस्तू बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत.

पाककला स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी रेवती राणे (मो. ९४२२३७९६१२) व रेखा काणेकर (मो. ९७६५२३११४३) तसेच उखाणा स्पर्धेसाठी चांदणी कांबळी व श्रुती वर्दम यांच्याशी संपर्क साधावा. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते यांनी केले.

यावेळी शिवसेना जि.प. सदस्य दादा साईल, शहरप्रमुख अभी गावडे, चेतन पडते, राकेश कांदे, रिया गडेकर, जान्हवी कदम, दिपाली कानसे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.