रत्नागिरीत दिवसाढवळ्या घरफोडी; 4.16 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजीकच्या नाचणे-सावंतनगर येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 4 लाख 16 हजार 700 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले. घरफोडीची ही घटना मंगळवार 9 जून रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 4 वा. कालावधीत घडली आहे.

याबाबत हेमंतकुमार महेंद्र चोप्रा (23,रा.आसमंत सावंतनगर-नाचणे,रत्‍नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्‍यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कुलप कडीसहित उचकटून घरात प्रवेश केला. त्‍यानंतर घरातील लोखंडी व लाकडी कपाटातून सोन्याचा 40 ग्रॅमचा सोन्याचा हार,सोन्याचे 11.78 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र,20 ग्रॅम सोन्याच्या दोन बांगड्या,10 ग्रॅम सोन्याची चेन,2ग्रॅम सोन्याची अंगठी,7 ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट,सोन्याची दोन कॉईन,सोन्याचे पेंन्ड,2.8 ग्रॅम सोन्याची अंगठी,10 हजारांची मोत्‍याची माळ तसेच 2 हजारांची कृत्रिम मोत्‍याची माळ,चांदीचे ताम्हान,तांब्या व फूलपात्र,चांदीच्या दोन अंगठ्या, असा एकूण 4 लाख 16 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

घरफोडीच्या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान,पोलिस सीसीटिव्ही फूटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्‍न करत असून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.