देवरूखात भटक्या कुत्र्यांनी मांडला उच्छाद

पोलीसांच्या गाड्यांवरील सीटकव्हर फाडून टाकली

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख शहरात सध्या भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणेलाही या कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांनी आता थेट वाहनांनाच आपले लक्ष्य बनवायला सुरुवात केली असून, महागडी सीट कव्हर्स फाडून वाहनधारकांचे हजारो रुपयांचे नुकसान केले जात आहे.

विशेष म्हणजे, कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस ठाण्याच्या परिसरातच किमान ८ ते १० पोलीसांच्या मोटारसायकलची सीट कव्हर्स कुत्र्यांनी फाडून टाकली आहेत. जर पोलीसच या त्रासातून सुटले नसतील, तर सर्वसामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली असून रात्रीच्या वेळी रस्त्यावरून चालणे किंवा दुचाकी चालवणे धोक्याचे बनले आहे.

या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मुख्य जबाबदारी देवरुख नगर पंचायतीची आहे. मात्र, नगरपंचायत प्रशासन या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. या वाढत्या त्रासामुळे वाहनचालकांना रोज आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. देवरुख नगर पंचायतीने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने मोहीम हाती घ्यावी, अशी तीव्र मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा, संतप्त नागरिक आणि वाहनचालक नगरपंचायतीविरोधात आक्रमक पाऊल उचलण्याच्या पवित्र्यात आहेत.