तालुक्यात २६ हजार ३७ घरगुती तर ९ सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यात ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत लाडक्या गणरायाचे वाजतगाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे संपूर्ण संगमेश्वर तालुका भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. तालुक्यात यावर्षी २६ हजार ३७ घरगुती तर ९ सार्वजनिक गणपतींची भक्तीभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
संगमेश्वरमध्ये जुनी पारंपरिक संस्कृती जपत लाडक्या बाप्पाचे बोटीतून आणि होडीतून मंगलमय आगमन झाले. पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधने नसताना नदीच्या मार्गाने मूर्ती आणली जात असे. हीच परंपरा कायम ठेवत रत्नागिरीतील संगमेश्वर परिसरातील भातगाव-करजुवे खाडीतून नदीच्या पाण्यातून होडीत बसवून गणरायाची मूर्ती वाजतगाजत आणण्यात आली. नदीकाठावर बाप्पाचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. तालुक्यातील करजुवे आणि परचुरी गावांमध्ये महिलांनी कित्येक वर्षांची परंपरा जिवंत ठेवली आहे. येथील महिलांनी स्वतः डोक्यावर गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन हिरव्यागार भातशेतीच्या बांधावरून चालत येत बाप्पाला घरी आणले.
महिलांनी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने ही जबाबदारी सांभाळली असून, ‘लोकरंग’ आणि कोकण संस्कृतीचे हे विलोभनीय रूप पाहायला मिळाले. ग्रामीण भागात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मूर्तीशाळेतून बाप्पाला आणताना बाल्या नृत्याचा ठेका, ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत बच्चेकंपनीसह अबालवृद्धांनी मिरवणुका काढल्या. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई-पुण्याहून आलेल्या चाकरमान्यांमुळे तालुक्यातील सर्वच बाजारपेठा आणि गावे गजबजली असून उत्सवाचा आनंद शिगेला पोहोचला आहे.













