कोकणातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जीआयटी कॉलेजचा ऐतिहासिक पुढाकार; ‘देवराई’, ‘धनेश पक्षी संवर्धन’ आणि ‘वृक्ष वाचनालय’ प्रकल्प जुलैपासून सुरू

खेड (प्रतिनिधी) : कोकणातील समृद्ध जैवविविधतेचे संरक्षण, दुर्मिळ वनस्पती प्रजातींचे संवर्धन आणि विस्कळीत होत चाललेल्या अन्नसाखळीला बळकटी देण्यासाठी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जीआयटी), लवेल-चिपळूण येथे एक महत्त्वाकांक्षी पर्यावरणीय उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जीआयटीच्या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये ‘देवराई प्रकल्प’, ‘धनेश पक्षी संवर्धन प्रकल्प’ आणि ‘वृक्ष वाचनालय प्रकल्प’ या तीन नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी तथा कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. नितीन कोळेकर यांनी दिली.
या उपक्रमासाठी जीआयटी कॉलेज, सह्याद्री संकल्प सोसायटी आणि वन विभाग, चिपळूण यांच्यात त्रिपक्षीय भागीदारी करण्यात आली आहे. कोकणातील पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि स्थानिक जैवविविधतेचे जतन करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकल्पांसाठी जीआयटीच्या परिसरातील तब्बल तीन एकर जागा राखीव ठेवण्यात आली असून त्या ठिकाणी निसर्गाचे जिवंत संग्रहालय उभारले जाणार आहे. प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा थेट सहभाग. यासाठी ‘वृक्ष दत्तक योजना’ राबविण्यात येणार असून प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी एक झाड दत्तक घेणार आहे. त्या झाडाची देखभाल, संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी संबंधित व्यक्तीकडे असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता आणि जबाबदारीची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५५० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पश्चिम घाट आणि कोकणातील ५० पेक्षा अधिक स्थानिक व दुर्मिळ वृक्षप्रजातींचा यात समावेश असणार आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक प्रजातींची रोपे सह्याद्री संकल्प सोसायटी आणि वन विभागाच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वृक्षांमुळे स्थानिक पक्षी, कीटक आणि वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध होऊन पर्यावरणीय अन्नसाखळी अधिक सक्षम होणार आहे.
‘देवराई प्रकल्पा’अंतर्गत पारंपरिक पद्धतीच्या घनदाट जंगलाची निर्मिती केली जाणार आहे. तर ‘धनेश पक्षी संवर्धन प्रकल्पा’द्वारे जंगलाचा शेतकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेश पक्ष्यांसाठी आवश्यक फळझाडांची लागवड करून त्यांचा नैसर्गिक अधिवास पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय ‘वृक्ष वाचनालय प्रकल्पा’मध्ये प्रत्येक झाडाला क्यूआर कोड देण्यात येणार असून तो स्कॅन केल्यावर झाडाची वैज्ञानिक, पर्यावरणीय आणि औषधी माहिती विद्यार्थ्यांना मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे वृक्ष वाचनालय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे आणि संशोधनाचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे.
या प्रकल्पाच्या यशस्वी नियोजनासाठी सह्याद्री संकल्प सोसायटीचे संचालक प्रतीक मोरे यांनी दुर्मिळ रोपांची निवड आणि तांत्रिक मार्गदर्शनात मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच चिपळूण वन विभागानेही आवश्यक शासकीय पाठबळ, मार्गदर्शन आणि रोपांची उपलब्धता करून दिली आहे.
याप्रसंगी जीआयटीचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील आणि उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी सर्व सहकाऱ्यांचे तसेच सहयोगी संस्थांचे आभार मानले. या सामूहिक प्रयत्नातून उभारला जाणारा पर्यावरण संवर्धनाचा हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल आणि निसर्ग संरक्षणाची नवी दिशा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.