विनापरवाना खत उत्पादन व वाहतूक आणखी एका संशयीता विरुद्ध गुन्हा दाखल

देवगड / प्रतिनिधी

 

विनापरवाना अवैध खताचे उत्पादन करून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्याप्रकरणी तसेच सदर खताचा विनापरवाना साठा केल्याप्रकरणी अशोक मोरे याच्यासह सत्यवान परशुराम परब (६२, रा. वाडा- देवगड) या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १० जून रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास वाडा येथील आंबेडकर चौक येथे करण्यात आली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी (गुणनियंत्रक) मानसी बाळकृष्ण पवार (मूळ रा. पंढरपूर, सध्या रा. समर्थ प्लाझा- देवगड) या देवगड तालुक्यामध्ये होणाऱ्या बोगस खत विक्री, पुरवठा, वाहतूक याला प्रतिबंध करण्याकरिता १० जून रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास देवगड ते पडेल या मार्गावर कृषी विभागाच्या पथकासमवेत गस्त घालत होत्या. यावेळी संशयित अशोक मोरे हे विनापरवाना नवसंजीवनी नावाचे सेंद्रीय खताचे उत्पादन करून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यातील ट्रकमधून (एमएच ४४-९०५४) वाडा चांभारघाटी येथील आंबेडकर चौक येथे अवैध वाहतूक करताना निदर्शनास आले. सदर खताची तेथील संशयित सत्यवान परब याने विक्री करण्याच्या उद्देशाने खरेदी करून विनापरवाना खताचा साठा केल्याचेही कृषी विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आले. याबाबत मानसी पवार यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार दोन्ही संशयितांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३, ३ (२), (अ), ३ (२), (ड), ७, ७ (१) (अ), (२), रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ चे खंड ७, ८, १२, १३ (१), १९ (अ), १९ (क) (१), १९ (क) (व) सह खत वाहतूक नियंत्रण आदेश १९७३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.