दापोलीच्या जिद्द आणि ताकदीने दिल्ली जिंकली

पांगारीच्या शुभम लोंढेची ‘पॉवरलिफ्टिंग’मध्ये रौप्य कामगिरी..

प्रशांत कांबळे : दापोली
ग्रामीण भागात जन्माला आलेल्या अनेक युवकांच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने असतात; मात्र त्या स्वप्नांना दिशा देण्यासाठी आवश्यक असते ती जिद्द, सातत्य, शिस्त आणि स्वतःवरचा विश्वास. दापोली तालुक्यातील पांगारी-तर्फ हवेली, गोविंदशेत वाडी या छोट्याशा गावातून पुढे आलेल्या शुभम काशिनाथ लोंढे या युवकाने आपल्या मेहनतीच्या जोरावर हेच सिद्ध करून दाखवले आहे. पॉवरलिफ्टिंगसारख्या ताकद आणि शिस्तीची कसोटी पाहणाऱ्या क्रीडा प्रकारात शुभमने आधी रत्नागिरी जिल्ह्याचे, त्यानंतर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदकाची कमाई केली आहे.
शुभमचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आपल्या गावातच झाले. पुढील शिक्षणासाठी तो मुंबईत आला आणि TYBCom पर्यंतचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच व्यायामाची आवड असलेल्या शुभमने याच आवडीला आपल्या आयुष्याचे ध्येय बनवण्याचा निर्णय घेतला. केवळ स्वतः व्यायाम करण्यापुरते मर्यादित न राहता फिटनेस क्षेत्रात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याच्या उद्देशाने त्याने इंटिग्रॅटेड फिटनेस अँड स्पोर्ट्स इन्स्टिटयूट (IFSI) येथे ट्रेनर कोर्स पूर्ण केला. या प्रवासात त्याला निखिल अष्टीवाले सर यांच्या मार्गदर्शनाचा मोठा फायदा झाला. ट्रेनर कोर्समधून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे शुभमने स्वतःच्या पॉवरलिफ्टिंग प्रशिक्षणाला सुरुवात केली. उपलब्ध साधनसामग्रीपेक्षा मेहनत, सातत्य आणि प्रशिक्षणातील शिस्त यांना त्याने अधिक महत्त्व दिले. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत त्याने सराव सुरू ठेवला आणि त्याचा परिणाम स्पर्धेच्या मैदानात दिसू लागला.
आज शुभम मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील फ्लेक्स आयर्न जिममध्ये ट्रेनर आणि फिटनेस कोच म्हणून कार्यरत आहे. स्वतःचा फिटनेस जपतानाच इतरांनाही व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी मार्गदर्शन करण्याचे काम तो करीत आहे. भारतीय पॉवर लिफ्टिंग फेडरेशन शी संलग्न असलेल्या अमॅच्युअर पॉवर लिफ्टिंग असोसिएशन, महाराष्ट्र चे सचिव संतोष शिंदे सर यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शकांचे सहकार्य आणि मार्गदर्शनही त्याच्या प्रवासात महत्त्वाचे ठरत आहे.
१ आणि २ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये शुभमने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. राज्यस्तरावर केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
ग्रामीण भागातून आलेल्या या युवकासाठी ही निवड केवळ वैयक्तिक यश नव्हते, तर पांगारीसह संपूर्ण दापोली आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण होता.
राज्य स्पर्धेतील या यशानंतर शुभमसमोर राष्ट्रीय स्तराचे आव्हान होते. दिल्लीतील पितमपुरा येथे ८, १० आणि ११ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
देशभरातून आलेल्या खेळाडूंच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत शुभमने आपली ताकद, तंत्र आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणाच्या जोरावर पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आणि राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक पटकावले.
राज्यस्तरावर रौप्यपदक मिळवल्यानंतर थेट राष्ट्रीय स्तरावरही रौप्यपदक मिळवणे, ही शुभमच्या क्रीडा प्रवासातील महत्त्वाची कामगिरी ठरली आहे.
गावच्या मातीतून मुंबईपर्यंत आणि आता राष्ट्रीय व्यासपीठापर्यंतचा शुभमचा हा प्रवास ग्रामीण भागातील युवकांसाठी विशेष प्रेरणादायी ठरत आहे. मुंबईसारख्या महानगरात शिक्षण आणि नोकरी सांभाळत त्याने आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे, पॉवरलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेत असताना त्याने स्वतःच्या मेहनतीवर आणि ट्रेनर कोर्समधून मिळालेल्या ज्ञानावर भर देत सातत्याने सराव केला.
परिस्थिती कोणतीही असो, आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे मेहनत घेतली आणि सातत्य ठेवले तर ग्रामीण भागातील युवकही राज्य, राष्ट्रीय आणि त्यापुढील व्यासपीठावर पोहोचू शकतात, हे शुभमने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.
सध्या मुंबईतील रामगड नगर, गोशाळा रोड, मुलुंड पश्चिम येथे वास्तव्यास असलेल्या शुभमसमोर आता क्रीडा क्षेत्रात आणखी मोठी भरारी घेण्याचे ध्येय आहे. रत्नागिरीच्या मातीतून सुरू झालेला त्याचा प्रवास आता राज्याच्या पलीकडे राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचला आहे. दापोली तालुक्यातील पांगारीच्या या सुपुत्राने मिळवलेली दोन रौप्यपदके ही केवळ पदके नसून ग्रामीण युवकांच्या स्वप्नांना बळ देणारी प्रेरणा चिन्हे ठरली आहेत.