खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील नामांकित सर्जन डॉ. उपेंद्र तलाठी आणि डॉ. सौ. रूपाली तलाठी यांची कन्या डॉ. अन्वी तळाठी यांनी एमबीबीएस (MBBS) पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून खेड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमधून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. अन्वी तलाठी यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे. वैद्यकीय क्षेत्राची समृद्ध परंपरा लाभलेल्या कुटुंबातून आलेल्या अन्वी यांना लहानपणापासूनच सेवाभाव आणि रुग्णसेवेचे संस्कार मिळाले. त्यांचे वडील डॉ. उपेंद्र तलाठी हे खेड शहरातील प्रसिद्ध सर्जन असून ‘मधुसिद्धी हॉस्पिटल’चे संचालक आहेत. ते सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या मातोश्री डॉ. सौ. रूपाली तलाठी या देखील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
डॉ. अन्वी यांच्या यशाबद्दल खेड नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा विशेष सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवीताई राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष श्री. सतीश उर्फ पप्पू चिकणे, शिवसेना गटनेते श्री. निकेतन पाटणे, नगरसेवक श्री. संजय मोदी, श्री. स्वप्निल सैतवडेकर, श्री. प्रेमळ चिखले, श्री. मिनार चिखले, सौ. संजना कुडाळकर, श्री. आरिफ मुल्लाजी, श्री. शैलेशेठ सुरा आणि श्री. पंकज शहा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. अन्वी तलाठी यांनी वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत समाजसेवेची परंपरा पुढे न्यावी आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या या यशामुळे खेड शहरातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना नवी दिशा मिळाली आहे.
डॉ. अन्वी तलाठी यांच्या या यशामुळे तलाठी कुटुंबासह संपूर्ण खेड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.













