वारसा संवर्धनाचा दिला संदेश; नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग
दापोली (विशेष प्रतिनिधी) : कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कर्तव्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत दापोली पोलिसांनी हर्णे येथील ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर विशेष स्वच्छता मोहीम राबवून वारसा संवर्धनाचा आदर्श घालून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य, सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या मोहिमेत दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. गड-किल्ल्यांच्या परिसरात पडलेला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तसेच परिसरातील वाढलेली झाडे-झुडपे काढून परिसर स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्याचे काम करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची ओळख असलेले गड-किल्ले हे राज्याची अमूल्य संपत्ती असून त्यांचे संवर्धन व स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना प्रेरणा मिळावी तसेच पुढील पिढ्यांसाठी हा वारसा जतन व्हावा, यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्वच्छता मोहिमेदरम्यान गड-किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाबाबत जनजागृतीही करण्यात आली. ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली.
दापोली पोलिसांच्या या उपक्रमाला हर्णे परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्थानिक नागरिकांनी स्वखुशीने सहभागी होत स्वच्छता मोहिमेला हातभार लावला. पोलिसांनी हाती घेतलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून इतिहासाप्रती आदर, सामाजिक जबाबदारी आणि वारसा संवर्धनाचा संदेश देणारी ही मोहीम ठरली आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.











