पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून ज्येष्ठ कार्यकर्ते कै.रमेश दळवी यांच्या कुटुंबाचे सांत्वन

राणे कुटुंब नेहमीच दळवी परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील : ना. नितेश राणे

दोडामार्ग | प्रतिनिधी :माजी मुख्यमंत्री, खासदार नारायणराव राणे यांचे अत्यंत विश्वासू व कट्टर कार्यकर्ते, तसेच माजी सैनिक सहकारी पतसंस्था बँकेचे माजी अध्यक्ष रमेश दळवी यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी बोडदे येथील दळवी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली व सांत्वन केले. “राणे कुटुंब या कठीण प्रसंगात दळवी परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, पूर्वीप्रमाणेच यापुढेही कुटुंबाकडे आमचे पूर्ण लक्ष राहील,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

कै. रमेश दळवी हे भारतीय सैन्यातून (आर्मी) निवृत्त झाल्यानंतर नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून राजकारणात सक्रिय झाले होते. राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दोडामार्ग तालुक्यात पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सांभाळली. शिवसेना पक्षात कार्यरत असताना त्यांनी शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि तालुका प्रमुख म्हणून अत्यंत प्रभावी काम केले. त्यानंतर काँग्रेस पक्षात असताना त्यांनी दोडामार्ग काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी चोख पार पाडली.

दोडामार्ग तालुक्यात शिवसेना-भाजप युतीची तसेच काँग्रेसची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सत्ता मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. एक आक्रमक आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची तालुक्यात मोठी ओळख होती.

त्यांच्या निधनामुळे दळवी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहभागी होत ना. नितेश राणे यांनी बोडदे येथील निवासस्थानी कै. रमेश दळवी यांच्या पत्नी, मुलगा विरेंद्र दळवी व कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. “रमेश दळवी यांनी आयुष्यभर राणे साहेबांवर आणि राणे कुटुंबावर मनापासून निष्ठा ठेवली. त्यांची ही कमी कधीही भरून निघणारी नाही,” अशा भावना ना. राणे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

या सांत्वन भेटी दरम्यान दोडामार्ग भाजपा मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दिपक गवस कसई दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, दोडामार्ग हेल्पलाईन ग्रुपचे अध्यक्ष वैभव इनामदार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.