तालुका वासियांचे लागले लक्ष
लांजा (प्रतिनिधी) शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या तहसील कार्यालय, उपशेट्येवाडी येथील अंडरपाससाठी पुकारलेल्या २५ जून रोजीच्या आंदोलनाच्या भूमिकेवर लांजा तालुका संघर्ष समिती ठाम राहणार की आंदोलनाची तलवार म्यान करणार? याकडे आता लांजावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
लांजा शहरातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर कोर्ले तीठा ते साटवली फाटा असा उड्डाणपूल आहे. इथून पुढे दोन्ही बाजूला दिशांना उंचचउंच भिंत आहे. या भिंतीमुळे सध्या प्रचंड गैरसोय झाली आहे. लांजा तहसील कार्यालय या अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या ठिकाणी भरावाची भिंत उभारल्याने महामार्गाचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अंडरपास असणे अत्यंत गरजेचे होते. कारण या ठिकाणी लांजा हायस्कूल असून हायस्कूचे सुमारे ३००० विद्यार्थी, मराठी शाळेचे ६०० विद्यार्थी प्रवास करतात. अंडर पास नसल्याने या सर्व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यात या ठिकाणी तहसिल कार्यालय, पंचायत समिती, पोलिस ठाणे, ग्रामिण रुग्णालय,माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच झेरॉक्स सेंटर सरकारी दस्तऐवज तयार करण्याचे सेंटर हे सर्व एकाच ठिकाणी आहेत.पण या ठिकाणी अंडरपास न ठेवल्याने विभागणी झाली आहे. गर्दीमुळे अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच लांजा उपशेट्येवाडी येथे येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथे सुमारे १५०० ते २००० नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे वरील ठिकाणी अंडरपास ठेवावेत अशी आग्रही मागणी आहे. मात्र तरीही या ठीकाणी अंडरपास (भुयारी)मार्ग न ठेवल्यामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेली १५ वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असताना
अंडरपास चे काम करणे सोईस्कर होते. मात्र आता भरावाची भिंत उभारल्याने त्या ठिकाणी अंडरपास ठेवणे शक्य होईल का? असे प्रश्न उपस्थित होत आहे
तसेच भिंत उभारल्याने सद्यस्थितीत अंडरपास होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
वास्तविक पाहता, उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर लांजा हायस्कूलचे विद्यार्थी, ग्रामस्थ वर्ग यांची अंडरपास अभावी गैरसोय होईल ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन लोकप्रतिनिधींनी वरील ठिकाणी अंडरपास होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे अपेक्षित होते. विद्यार्थी हित आणि लोकहिताच्या दृष्टीने प्रसंगी आंदोलनाची भूमिका बजावले की तरी चालली असती. जेणेकरून अंडरपास चा प्रश्न मार्गी लागून आजची परिस्थिती उदभवली नसती. जनतेचे प्रश्न, समस्या लोकप्रतिनिधींकडून सुटत नसतील तर. जनतेने कोणाकडे अपेक्षा करावी? हा देखील प्रश्नच आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवर शहरातील उड्डाण पुलाचे काम अंतीम टप्प्यात आले असताना लांजा तालुका संघर्ष समितीने २५ जून रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. प्रसंगी मुंबई हायकोर्टात या विरोधात लढा देण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. त्यामुळे संघर्ष समितीच्या भूमिकेकडे लांजा शहरासह तालुक्यातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यार्थ्यांच्या, लोकांच्या हितासाठी संघर्ष समिती आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का? की महामार्ग शासनाच्या नेहमीच्या घिस्यापिट्या आश्वासनावर आपले आंदोलन मागे घेणार याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.












