शहराचा सर्वांगीण विकास, रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारणार
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या शाश्वत विकासासाठी प्रभावी पावले उचलली जात असून, नागरिकांच्या रोजगारासह विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावंतवाडी नगर परिषदेच्या सभेनंतर त्या बोलत होत्या.
शहराचा सर्वांगीण विकास, रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद सातत्याने सकारात्मक प्रयत्न करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी नगरपरिषदेच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना आणि लोकहितमयी निर्णयांची माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका निलम नाईक, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, वीणा जाधव आणि सुकन्या टोपले आदी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास नगरपरिषदेचे प्राधान्य आहे. लाड पागे योजनेखाली २७ जणांना नगरपरिषदेत सामावून घेण्यात आले असून, आगामी काळात नगरपरिषदेच्या मालकीच्या जागांवर नवीन रोजगार प्रकल्प आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. तसेच, मुंबई विद्यापीठासाठी दिलेल्या जागेतील सिलिंग कटींदर प्राण्यामुळे तुटले असून, त्याची दुरुस्ती विद्यापीठाकडून तातडीने करून घेतली जाईल. आमदार दीपक केसरकर यांनी या विद्यापीठाच्या माध्यमातून स्थानिक मुलांना पदवी शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून दिली असून, नगरपरिषद त्यांच्या या निर्णयाचा आदर राखत आहे, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
शहरात घनकचरा नियोजनाला गती देतानाच प्लास्टिक मुक्तीसाठी नगरपरिषदेने नवीन ‘बॉटल क्रशर मशीन’ कार्यान्वित केल्या आहेत. यामध्ये प्लास्टिक बाटली क्रश करताच नागरिकांना चॉकलेट मिळणार आहे, जेणेकरून लोकांना कचरा व्यवस्थापनाची चांगली सवय लागेल. तसेच, प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून अवघ्या ५ रुपयांत कापडी पिशवी देणारी मशीनही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील वाहतूक व पार्किंग समस्येवर पोलिसांसोबत बैठक झाली असून, त्यावर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात येईल. शहराच्या सीमांवर पडणाऱ्या कचऱ्याच्या समस्येबाबत शेजारील गावांच्या सरपंचांसोबत बैठक झाली आहे. याविषयी माहिती देताना आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, कचरा संकलनासाठी जागा व तरतुदी उपलब्ध करून देण्याकरिता पालकमंत्री व आमदारांचे लक्ष वेधले जाईल. तसेच, पुढील गुरुवारपासून शहरात ‘गावठी आठवडा बाजार’ व ‘राजभाजी महोत्सव’ सुरू करण्याचा मानस नगराध्यक्षांनी व्यक्त केला.
सावंतवाडी शहराची मूलभूत गरज असलेल्या ५७ कोटींच्या नळपाणी पुरवठा योजनेबाबत पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी सविस्तर भूमिका मांडली. माहितीच्या अधिकारात नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकांची दखल घेत, ठेकेदाराकडून झालेल्या चुका सुधारून काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने करून घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. धरणावरून आलेली मुख्य जलवाहिनी आता कोलगावपर्यंत पोहोचली असून, ही संपूर्ण योजना गुरुत्वाकर्षणावर आधारित राहणार आहे. या प्रकल्पावर पीएमसी आणि नगरपरिषदेचे अभियंता बारीक लक्ष ठेवून असून काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन वर्षे त्याची देखभाल-दुरुस्ती करण्याची पूर्ण जबाबदारी ठेकेदाराची असेल. सध्या पावसाळ्यामुळे काम थांबले असून खडीकरण पूर्ण झाले आहे व पाऊस संपताच डांबरीकरणाचे काम हाती घेतले जाईल. लवकरच शहराला पूर्णवेळ मुख्याधिकारी आणि पाणी पुरवठा अभियंता उपलब्ध होणार असून, दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागात केसरी व धरणाचे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे नगरपरिषदेचे नियोजन आहे.
सांडपाणी व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्पासाठी शासनाचा नवीन जीआर प्राप्त झाला असून, यापूर्वीच ठराव मंजूर झाला आहे. या कामाचा प्रशासकीय पातळीवर का विलंब झाला, याचा आढावा घेऊन स्वतः नगराध्यक्षा या कामाचा वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत. सर्व प्रशासकीय अडचणींवर मात करत सावंतवाडीला अधिक सुंदर आणि सुविधांयुक्त बनवण्यासाठी संपूर्ण नगरपरिषद संघटितपणे कार्यरत असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.













