सावंतवाडीत जुन्या वादातून तरुणावर लोखंडी गजाने हल्ला : गुन्हा दाखल

​सावंतवाडी:
मागील तात्कालीन भांडणाचा राग मनात धरून ‘माझ्याकडे खुन्नस नजरेने का बघतोस?’ असे विचारत शेजाऱ्याने एका तरुणाच्या डोक्यावर लोखंडी शीग (गज) मारून गंभीर दुखापत केल्याची घटना सावंतवाडीत घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजेर इम्तियाज बेग (वय २२, रा. बाहेरचा वाडा, सावंतवाडी) हा तरुण आणि त्याचा शेजारी अबुजर मुबिन बेग (वय १९) यांच्यात आधी काही कारणावरून भांडण झाले होते. याच जुन्या वादाचा राग अबुजर याच्या मनात होता.

​घटनेच्या दिवशी अबुजर याने फिर्यादी उजेर याला “माझ्याकडे खुन्नस नजरेने का बघतोस?” अशी विचारणा केली. याच गोष्टीचा राग अनावर झाल्याने आरोपी अबुजर याने उजेर याला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपीने जवळ असलेली लोखंडी शीग उजेर याच्या डोक्यावर मारून त्याला गंभीर जखमी केले, तसेच हाताने मारहाणही केली.

​या हल्ल्यानंतर जखमी उजेर याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर, उजेर बेग याने दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात आरोपी अबुजर मुबिन बेग (वय १९) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.