मसुरे | झुंजार पेडणेकर :
राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन 2023 साठीच्या विविध पुरस्कारांची घोषणा राज्य शासना कडून करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांची कृषी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार 2023 साठी झाराप कुडाळ येथील शरद गणपत धुरी यांची निवड जाहीर झाली आहे. तर उद्यान पंडित पुरस्कार 2023 साठी कुंभारमाठ मालवण येथील डॉ. उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांची निवड जाहीर झाली आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) या विभागासाठी मांगवली तालुका वैभववाडी येथील महेश संसारे यांची निवड शुक्रवारी जाहीर झाली आहे.
राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र, तसेच, फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना, डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट/आदिवासी गट), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार (आयुक्तालय/मंत्रालय स्तर) असे विविध पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात येते. त्यानुषंगाने सन २०२३ करिता विविध कृषि पुरस्कार प्रदान करुन, शेतकरी/संस्था यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांची शासनाच्या पुरस्कारांसाठी निवड झाल्या बद्दल जिल्हा कृषी विभागाकडून अभिनंदन होत आहे.












