महावितरणचा भोगळ कारभार; बिल भरूनही वीज गायब, ग्राहकांची लूट सुरूच!

स्मार्ट मीटर म्हणजे ‘कचरा कुंडी’; न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा आक्रमक इशारा 

न्हावेली (श्रेयस गावडे):विद्युत वितरण कंपनीचा (महावितरण) कारभार सध्या पूर्णपणे कोलमडला असून, ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नियमित वीज बिल भरूनही वीज गायब होण्याचे प्रकार वाढले असून, महावितरणचे स्मार्ट मीटर म्हणजे केवळ ‘कचरा कुंडी’ बनले आहे, अशी तीव्र घणाघाती टीका न्हावेली गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर यांनी केली आहे. महावितरणच्या या भोगळ कारभाराविरोधात त्यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे.

 

मळगाव रेल्वे स्टेशन समोरील एका कोल्ड्रिंक हाऊसचा वीज पुरवठा कालपासून अचानक खंडित झाला आहे. संबंधित दुकानदाराने नियमित वीज बिल भरले असूनही महावितरणने कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज गायब केली. यामुळे दुकानातील फ्रीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये असलेले हजारो रुपयांचे सामान खराब झाले असून दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या गंभीर समस्येबाबत संबंधित भागातील वायरमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते फोन उचलत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महावितरणचे वायरमन ग्राहकांना योग्य सर्व्हिस देण्यास पूर्णपणे असमर्थ ठरत आहेत.

 

ग्राहकांना वेळेवर कोणतीही सेवा मिळत नसताना, वीज बिलांमध्ये मात्र ‘सर्व्हिस चार्जेस’ (सेवा शुल्क) लावून ग्राहकांची उघडपणे आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोपही अक्षय पार्सेकर यांनी केला आहे. एकीकडे सेवा शून्य आणि दुसरीकडे शुल्काची वसुली, असा दुटप्पी कारभार महावितरणकडून सुरू आहे.

 

या सर्व प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना अक्षय पार्सेकर म्हणाले की, महावितरणच्या ढिसाळ आणि भोगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. वायरमन फोन उचलत नाहीत आणि अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. जर यापुढेही ग्राहकांकडून अशाच तक्रारी येत राहिल्या, तर महावितरणला त्यांच्याच भाषेत जशास तसे उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा त्यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.