आ. किरण सामंत यांनी लक्ष घालण्याची मागणी
राजापूर (प्रतिनिधी) राजापुरात काही ठेकेदारांच्या अनास्थेमुळे राजापूर नगरपरिषद हद्दीतील विकासकामांचा वेग पूर्णपणे ठप्प झाल्याचा आरोप नगरसेवक महेश शिवलकर यांनी केला आहे. काम करण्याचे आदेश मिळूनही अनेक ठेकेदारांनी कामांना सुरूवात न केल्याने नागरीकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याचा फटका पावसात शहर वासीयांना बसणार असून या पार्श्वभूमीवर शिवलकर यांनी आ. किरण सामंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दाद मागत लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान २०२५-२६ तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या विशेष नागरी सेवा योजनेंतर्गत राजापूर शहरात विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. अर्थात आ. सामंत यांचाच यासाठी पुढाकार आहे. नगरपरिषदेने काही महिन्यांपूर्वी या कामांसाठी संबंधित ठेकेदारांना अधिकृत वर्क ऑर्डर्स दिल्या होत्या. मात्र नियमानुसार ठराविक कालावधीत अर्थात विहित मुदतीत कामे सुरू करणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नाही.
नगरसेवक महेश शिवलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार काही ठेकेदारांनी एकाचवेळी अनेक कामांचे कंत्राट घेतले. मात्र त्यातील बहुतांश कामे रखडलेली आहेत. एकही पूर्णत्वाला गेलेले नाही. याबाबत वेळोवेळी तोंडी व लेखी सूचना देऊनही ठेकेदारांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी विकासकामे कागदावरच राहिली असून नागरीकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील रस्ते, वॉटर डिपीआरच्या कामासाठी खोदलेले रस्ते, गटारे व इतर मुलभूत सुविधांशी कामे प्रलंबित असल्यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे शिवलकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. या रखडलेल्या कामांमुळे राजापूरच्या विकासप्रक्रियेलाच खीळ बसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान विकासकामातील दिरंगाईमुळे नागरीकांच्या रोषाला आ. किरण सामंत यांनाही नाहक सामोरे जावे लागत असल्याचे सांगत करारातील अटींचे उल्लंघन करणा-या आणि कामांबाबत निष्काळजीपणा दाखवणा-या ठेकेदारांच्या वर्कऑर्डर्स तत्काळ रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
राजापूर शहराच्या विकासाला खीळ घालणा-या या प्रकरणात नगरपरिषद प्रशासन आणि
आ. किरण सामंत कोणती भूमिका घेतात तसेच संबंधित ठेकेदारांवर काय कारवाई होते याकडे आता राजापूरकरांचे लक्ष लागले आहे.












