चिपळूण :
घोरण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाच्या ईएनटी विभागात ७ ते २१ जुलै या कालावधीत विशेष निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी रुग्णांची नावनोंदणी २० जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
या पंधरा दिवसांच्या शिबिरामध्ये घोरणाऱ्या रुग्णांसाठी सवलतीच्या दरात ‘स्लीप स्टडी’ ही विशेष तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीद्वारे घोरण्याचे नेमके कारण शोधून त्यानुसार उपचाराची दिशा निश्चित केली जाणार आहे. ईएनटी सर्जन डॉ. प्रतीक शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज एका रुग्णाची स्लीप स्टडी करण्यात येणार असून एकूण पंधरा रुग्णांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
वालावलकर रुग्णालयाच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. सुवर्णा पाटील यांनी सांगितले की, घोरणे ही केवळ एक सवय नसून अनेकदा गंभीर आजाराचे लक्षण असते. स्लीप अॅपनियामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करणे आणि गरजू रुग्णांना योग्य निदान व उपचार उपलब्ध करून देणे हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे.
\रात्री झोपेत मोठ्याने घोरणे, सकाळी उठल्यानंतरही थकवा जाणवणे, दिवसभर झोप येणे, वाहन चालवताना डुलकी लागणे, झोपेत गुदमरल्यासारखे वाटणे, नैराश्य किंवा कोणत्याही कामात उत्साह न वाटणे ही स्लीप अॅपनियाची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.












